scorecardresearch

देगलूरमधील विजयानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाच्या एकाधिकारशाहीला…!”

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

Results of Zilla Parishad Panchayat Samiti
काँग्रेस नेते व ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण

महाराष्ट्रात अशोक चव्हाण यांचा आणि पर्यायाने काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नांदेडमधली देगलूर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. देगलूर-बिलोली मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपानं आपली ताकद पणाला लावली होती. या निवडणुकीत अखेर देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा विजय निश्चित झाला आहे. पहिल्याच फेरीपासून जितेश अंतापूरकर यांनी घेतलेली आघाडी वथेट १६व्या फेरीपर्यंत कायम राहिल्यानंतर त्यांचा विजय नक्की झाला. यानंतर काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांचा पराभव निश्चित झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. “रावसाहेब अंतापूरकर यांना यानिमित्ताने लोकांनी वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. आजच्या निवडणुकीच्या निकालाचं जे चित्र आलं आहे, त्यावरून सोनिया गांधींनी उमेदवारी देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय, राहुल गांधींनी दिलेलं योगदान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार या सगळ्यांचा ही निवडणूक यशस्वी करण्यात सहभाग होता. हे सगळ्यांच्या मेहनतीचं सामुहिक फळ आहे”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

“सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असताना…”

“देगलूरच्या विजयामुळे महाविकासआघाडी आणि राज्य सरकार भक्कम झालं आहे. सरकार पाडण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असताना जनतेनं दिलेला कौल महत्त्वाचा आहे. जनता काँग्रेस-महाविकासआघाडीसोबत आहे. देशात हिमाचलमध्ये ३ पैकी ३, कर्नाटकमध्ये २ पैकी १, महाराष्ट्रात १ पैकी १, राजस्थानमध्ये २ पैकी २, तृणमूल काँग्रेसनं ४ पैकी ४ जागा, दादरा-नगर हवेली लोकसभेची जागा शिवसेनेनं तर हिमाचलमधली लोकसभेची जागा काँग्रेसनं जिंकली आहे. त्यामुळे हे निकाल निश्चितच भाजपाच्या विरोधात आहेत”, असं अशोक चव्हाण म्हणाले.

“या निकालांमधून राज्यात संदेश गेला”

“केंद्रीय मंत्री नांदेडमध्ये तळ ठोकून होते. त्यांनी मतदारांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्याचा परिणाम नांदेडमध्ये अजिबात दिसला नाही. अनेक लोक भाजपातील एकाधिकारशाहीला कंटाळून काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसचं बळ वाढलं आहे. राज्यात त्यानिमित्ताने संदेश गेला आहे. राज्यातलं सरकार भक्कम आहे”, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी भाजपाला सुनावलं आहे.

Bypoll Result 2021 : देगलूरमध्ये काँग्रेसचे जितेश अंतापूरकर मोठ्या फरकाने विजयी, भाजपाला धक्का

वंचितवर निशाणा

“एमआयएमला किंवा वंचितला मत देणं हे भाजपाला फायदेशीर ठरतं हे आता लोकांना कळलं आहे. एमआयएम या निवडणुकीत नव्हतं. पण वंचितनं उभा केलेला उमेदवार त्याच दृष्टीकोनातून उभा केला होता. वंचितला मिळालेली मतं ही गेल्या वेळीपेक्षा कमी मिळाली आहेत”, असं देखील ते यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-11-2021 at 17:12 IST

संबंधित बातम्या