अशोक गेहलोत यांचा आरोप

जळगाव : देशातील नरेंद्र मोदी सरकार ईडी, सीबीआय, आयकर यासारख्या खात्यांचा वापर विरोधकांना दडपण्यासाठी करीत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्याच कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी येथे केला.

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री गेहलोत येथे आले होते. परतीच्या प्रवासाला जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी विमानतळावर संवाद साधला. शरद पवार यांच्यावर कोणतीही कारवाई झाल्याचे आजपर्यंत ऐकले नव्हते. अचानक त्यांच्यावर २५ हजार कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीतर्फे गुन्हा दाखल केला जातो. ही कारवाई पवारांना लक्ष्य करण्यासाठी आहे. भाजप सरकार देशात अशाच पध्दतीचे राजकारण करीत आहे. भाजपच्या एकाही दोषी व्यक्तीवर कारवाई केली जात नाही. मात्र, विरोधी पक्षाच्या लोकांना त्यात अडकविले जात आहे. देशातील विरोधकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे.

भाजपमुळे देशातील वातावरण सध्या गढूळ झाले असून महागाई आणि बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. त्याची चिंता न करता भाजप सरकार हे स्वत:चा फायदा साधत आहे. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करण्याचा भाजपला अधिकार नाही. त्यांनी त्याबद्दल जनतेची माफी मागावी, असेही त्यांनी नमूद केले.