Atharv Sudame : सोशल मीडियावरचा प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे याने एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओत तो गणपतीची मूर्ती घ्यायला जातो आणि त्याला हे समजतं की मूर्तीकार मुस्लिम आहे. मग मूर्तीकार त्याला सांगतो तुम्हाला दुसरीकडून मूर्ती घ्यायची तर घ्या. पण अथर्व सुदामे त्याच मूर्तीकाराकडून मूर्ती घेतो. असा या व्हिडीओचा आशय होता. याच व्हिडीओवरुन वाद झाला आहे. ज्यानंतर अथर्व सुदामेने व्हिडीओ डिलिट केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

गणेशोत्सवाच्या निमित्तानं अथर्व सुदामेनं एक रिल शेअर केलं आहे. या रिलमध्ये अथर्व सुदामे एका भाविकाच्या भूमिकेत दिसतोय. अथर्व गणेशोत्सवासाठी गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तीकाराकडे जातो. मूर्तीकाराच्या कारखान्यात असंख्य मूर्ती असतात. त्यातली एक मूर्ती अथर्व बुक करतो. तेवढ्यात मूर्तीकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत तिथे येतो. तेवढ्यात अथर्व सुदामे आणि तो मूर्तीकार एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात मूर्तीकार अथर्वला सांगतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता. मूर्तीकाराला वाटतं की, अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? पण, अथर्व सुदामे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे, असं मूर्तीकाराला सांगतो. अथर्व सुदामे मूर्तीकाराशी बोलताना म्हणतो की, “माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही… तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील…” असा संवाद या रीलच्या शेवटी अर्थवच्या तोंडी देण्यात आला आहे. या रीलवरुन अथर्व सुदामेवर हिंदुत्वाद्यांकडून टीका होत आहे. ज्यानंतर हा व्हिडीओ अथर्वने डिलिट केला आहे. मात्र अथर्व सुदामेला पाठिंबा देण्यासाठी वकील असिम सरोदे मैदानात उतरले आहेत. असिम सरोदेंनी तू घाबरतो कशाला? म्हणत त्याला राज ठाकरेंनी केलेल्या कौतुकाची आठवण करुन दिली आहे.

आनंद दवे यांचं म्हणणं काय?

ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी अथर्व सुदामेवर संताप व्यक्त केला आहे. ते सुदामेला म्हणाले, “तू तुझा करमणुकीचा धंदा कर, लोकांना हसव आणि स्वतःचं पोट भर. यापेक्षा वेगळं काही करायला जाऊ नको. तुझा अभ्यास नसलेल्या गोष्टींमध्ये पडू नको. दुधात टाकलेली साखर ही साखरेचं काम करते की विषाचं काम करते ते गेल्या ७००-८०० वर्षांपासून हिंदू पाहत आणि भोगत आला आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्य, गणपती कसे बसवायचे, कोणाकडून घ्यायचे हा तुझा विषय नाही. तू त्यात लक्ष देऊ नको. हिंदूंना कळतं की कोणाकडून काय घ्यायचं, कधी घ्यायचं, कसं घ्यायचं. तू तुझा धंदा कर आणि तुझ्या सीमा मर्यादित ठेव. असं दवे यांनी म्हटलं आहे.

काय आहे असिम सरोदेंची पोस्ट?

अथर्व सुदामेने घाबरून व्हिडीओ डिलिट केला हे योग्य केले नाही असे वाटले.अथर्वबाबत अनेक लोक विविध मते मांडतात. त्याच्या व्हिडीओतील विनोदाच्या दर्जाबाबत बोलले जाते. परंतु त्याने ज्या सातत्याने रिल्स तयार केलेत, स्पर्धेच्या युगात स्वतःचा एक मार्ग तयार केला त्याचे कौतुक करायलाच पाहिजे. त्याचे काही विनोद अनेकांना उथळ,पांचट, निरर्थक वाटले असतील पण ते अश्लील नव्हते. कधी उथळ, गंभीर, गमतीदार, विचार प्रवर्तक तर कधी सुमारही अशा वळणांवरून एखादा विषय नेमकेपणाने हाताळला जातो तेव्हा धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्वने त्याचा अत्यंत सुंदर आणि सामाजिकता, बंधुभाव, प्रेम जपण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ डिलीट करणे मला चिंताजनक वाटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत. तेवढ्यासाठी मी अथर्वसोबत आहे. राज ठाकरेंनी अथर्वचे जाहीर कौतुक केले होत तेव्हापासून अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले असे सुद्धा दिसते. एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळाले. पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असतांना राज ठाकरेंनी व मनसेने अथर्वच्या सोबत उभे राहावे असे आताच माझे राज साहेबांसोबत बोलणे झाले. अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूया. अशी पोस्ट असिम सरोदेंनी केली आहे.