scorecardresearch

निवृत्ती मागतो, परंतु मिळत नाही!; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला राज्यपाल का बनवले समजत नाही? मी निवृत्ती मागतो, परंतु मिळत नाही.

निवृत्ती मागतो, परंतु मिळत नाही!; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भावना
स्नेहालय संस्थेने आयोजित केलेल्या युवक शिबिराचे उद्घाटन शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. गिरीश कुलकर्णी, अरुण शेठ, डॉ. मनीषा लढ्ढा, निवृत्त मेजर जनरल जीवन कनाई दास, मामून अख्तर, संजय गुगळे आदी उपस्थित होते.

नगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला राज्यपाल का बनवले समजत नाही? मी निवृत्ती मागतो, परंतु मिळत नाही. स्नेहालयच्या गिरीश कुलकर्णीसारखे समाज सुधारण्याचे काम करणारे राज्यपाल बनवले तर ते अधिक योग्य ठरेल, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नगरमध्ये बोलताना केले.

स्नेहालय संस्थेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज, शनिवारपासून तीन दिवस भारतासह बांगलादेश व नेपाळमधील युवकांसाठी आयोजित शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. या वेळी बांगलादेशमधील निवृत्त मेजर जनरल तथा महात्मा गांधी आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष जीवन कनाई दास, पश्चिम बंगालमधील समर्पण आरोग्य मिशनचे मामून अख्तर, स्नेहालयह्णचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, अध्यक्ष संजय गुगळे, अरुण शेठ, डॉ. मनीषा लढ्ढा, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

 स्नेहालयह्णच्या कामाचे कौतुक करत कोश्यारी म्हणाले, की हे असे काम करणे मला जास्त आवडले असते. परंतु मला दुसरेच काम करावे लागत आहे. मी राज्यपाल असलो तरी केवळ समोर आले त्यावर सह्या करण्याचे काम करतो. अनेकदा वाटते निवृत्त व्हावे. पण ती मिळत नाही.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत राज्यपाल म्हणाले, की  गेल्या ७५ वर्षांत आपल्या देशाची मोठी प्रगती झाली विशेषत: गेल्या ७-८ वर्षांत वीज, शौचालय, ३० कोटी लोकांचे बँक खाते निर्माण करणे, चांगले रस्ते तयार करणे असे मोठे काम झाले आहे. आपल्या शेजारचे देश चांगले असतील तर आपणही चांगले राहू शकतो. शेजारी देशात गडबड झाली तर आपल्याकडेही गडबड होते. शेजारचा देश बदमाश, दहशतवादी असेल तर त्याचा आपल्या देशावरही परिणाम होतो, म्हणूनच शेजारचे देश संस्कारी असावेत, त्यासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न सुरू आहेत. 

    ‘स्नेहालय’ला राज्यपालांची १० लाखांची देणगी

स्नेहालय संस्थेच्या कामाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोठे कौतुक करताना या संस्थेला १० लाख रुपयांची देणगी जाहीर केली. संस्थेचे कार्यकर्ते निक कॉक्स (इंग्लंड), अभियंता सबाआली, रंजना रणनवरे यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asks retirement governor bhagat singh koshyari sentiments ysh

ताज्या बातम्या