हर्षद कशाळकर

अलिबाग : निसर्ग, तोक्ते चक्रीवादळे आणि मागील वर्षीचा महापूर लक्षात घेऊन आपत्तीकाळात संपर्क यंत्रणा प्रस्थापित ठेवण्यासाठी सॅटेलाईट फोन आणि हॅम रेडिओची मदत घेतली जाणार आहे. यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे २४ सॅटेलाईट फोन्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. यापैकी सध्या एक सॅटेलाईट फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे.

गेल्या तीन वर्षांत रायगड जिल्ह्याला दोन चक्रीवादळे आणि महापुराचा सामना करावा लागला. या आपत्तीच्या काळात संपर्क यंत्रणा कोलमडल्याचे दिसून आले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करणे कठीण होऊन बसले होते. हे अनुभव लक्षात घेऊन आता रायगड जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे सॅटेलाईट फोन्स उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. जेणेकरून प्रतिकूल परिस्थितीत जिल्हा प्रशासनाशी संपर्क प्रस्थापित करणे शक्य होणार आहे.

जिल्हा प्रशासनाने २४ सॅटेलाईट फोन उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. यापैकी एक सॅटेलाईट फोन तातडीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. आणखी चार लवकरच उपलब्ध होणार आहे. तर १४ सॅटेलाईट फोन टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे पूर, भूस्खलन, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या संपर्क यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यास मदत होणार आहे.

या शिवाय महाड पोलादपूर परिसरासाठी ५४ वायरलेस युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहे. किल्ले रायगड आणि माथेरान अशा दोन ठिकाणी वायरलेस रीपिटर सेंटर्स कार्यान्वयित करण्यात आले आहेत. याशिवाय हॅम रेडिओचीही मदत घेतली जाणार आहे. याशिवाय पूरप्रवण क्षेत्रातील मोबाइल टॉवर्स उंचावर स्थलांतरीत करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून सर्व मोबाइल ऑपरेटर कंपन्यांना देण्यात आले आहेत. या मोबाइल टॉवर्सला २४ तास जनरेटर सुविधा तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सॅटेलाईट फोनला सॅट फोन असेही म्हणतात.  त्यामुळे ज्या ठिकाणी कुठलीच संपर्क यंत्रणा काम करत नाही त्या ठिकाणी हा फोन कार्यान्वित राहू शकतो. सध्या फक्त शासकीय यंत्रणांनाच हा फोन वापरता येतो. या फोनच्या वापरासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते. अतिवृष्टीमुळे फायबर केबल नेटवर्क यंत्रणा आणि वायरलेस यंत्रणा कोलमडल्यास सॅटेलाईट फोन सुविधा उपयुक्त ठरू शकते. रत्नागिरी जिल्ह्याने यापुर्वी आपत्ती व्यवस्थापनासाठी दोन वेळा सॅटेलाईट फोनची मदत घेतली होती. हा अनुभव लक्षात घेऊन आता रायगड जिल्ह्यातही सॅटेलाईट फोनची मदत आपत्ती व्यवस्थापनासाठी केली जाणार आहे.

निसर्ग वादळानंतर आणि महाड येथील महापुरानंतर संपर्क यंत्रणा कोलमडल्या होत्या, हा अनुभव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी २४ सॅटेलाईट फोन उपलब्ध व्हावे यासाठी मागणी केली आहे. यातील एक युनिट उपलब्ध झाले असून उर्वरित सॅटेलाईट फोन्स टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील.

 – डॉ. पद्मश्री बैनाडे. निवासी उपजिल्हाधिकारी