रेल्वे सुरक्षा दल व पोलीस यंत्रणा कुचकामी; महिला प्रवाशांमध्ये असुरक्षेची भावना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई: वसई लोकलमध्ये एका महिलेवर झालेल्या हल्लय़ाप्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलेले नाही. या हल्लय़ाच्या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये मात्र असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची संख्या वाढविण्याची मागणी महिला प्रवाशांनी केली आहे.

शुक्रवार १२ फेब्रुवारी रोजी वसईहून अंधेरी लोकलमध्ये चढलेल्या या महिलेवर हा हल्ला झाला होता. हल्लेखोराने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी महिलेने प्रतिकार करताच हल्लेखोराने तीक्ष्ण हत्याराने तिच्यावर वार केले होते.

वसई लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेवर चोरीच्या उद्देशाने झालेल्या हल्लय़ाला आठवडा उलटूनही हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात सापडलेला नाही. हल्लय़ाच्या या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये मात्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांची संख्या कमी असणे, आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची वेळेवर मदत न मिळणे अशा तक्रारी महिला प्रवाशांनी केल्या आहेत.

मी प्रवास करत असताना एकदा एका व्यक्तीने खिडकीजवळ बसलेल्या महिलेच्या कानातील कर्णफुले खेचले. पोलिसांना फोन केला तेव्हा पोलिसांनी घटनास्थळ दूर असल्याचे सांगितले. पोलिसांची ही निष्क्रियता गंभीर आहे, असे शिवानी दुबे या महिला प्रवाशाने सांगितले.

अनेकदा गर्दीच्या वेळेत पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा बलाचे जवान कमी प्रमाणात दिसून येतात, तर नेमक्या गर्दीच्या वेळा ठरवून तेव्हा नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासोबतच जर एखादी व्यक्ती प्लॅटफॉर्म पर्यंत धारदार शस्त्र आणू शकत आहे तर स्कॅनिंग मशीन सारखी सुविधा असणे गरजेचे आहे. जर आपल्या यंत्रणा इतक्या सोयी नाही पुरवू शकत तर नियोजनासाठी योग्य वेळी योग्य मनुष्य बळ उपलब्ध असावे, असे मत नेहा प्रभू या महिला प्रवाशाने व्यक्त केले. प्रवासादरम्यान जास्त करून रात्रीच्या प्रवासादरम्यान फेरीवाल्यांना लोकल डब्यात प्रवेश मिळू नये. त्यांना रोखण्यासाठी काही नियम केले जावे, अशी सूचना दर्शना सावंत या तरुणीने केली.

लोकल ट्रेनमध्ये जे कॅमेरा आहेत. ते असून नसल्यासारखे आहेत. केवळ पुरुषच नाहीत तर स्त्रिया देखील हल्ला करू शकतात तर यासाठी २४ तास महिला डब्यात एक तरी व्यक्ति सुरक्षिततेसाठी असावा. तसेच, कॅमेरा फुटेजवर लक्ष ठेवण्यासाठी एक व्यक्ती नेहमी असावी. जेणेकरून घटना घडण्याआधी किंवा घडत असताना तत्पर मदत मिळावी, असे मयूरा साळवे या महिला प्रवाशाने सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attacker on the female passenger is still not arrest zws
First published on: 20-02-2021 at 00:18 IST