बॉलिवूड दिग्दर्शक मुघलांना ‘देशाचे खरे शासक’ म्हणाला, भाजपा आमदाराने मात्र यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला

मुघलांना कमी लेखणारे चित्रपट पाहणे हे अडचणीचे तसेच लज्जास्पद वाटते असं या दिग्दर्शकाने म्हटलं आहे.

BJP on Kabir Khan
ट्विटरवरुन साधला निशाणा

मुघलांना कमी लेखणारे चित्रपट पाहणे हे अडचणीचे तसेच लज्जास्पद वाटते असं मत व्यक्त करणारा दिग्दर्शक कबीर खानला भाजपाच्या आमदाराने खडे बोल सुनावले आहेत. कबीर खानचे वक्तव्य हे बाटग्या मानसिकतेचं लक्षण असल्याचा टोला भाजपा आमदाराने लगावलाय. मुघलांना कमी लेखणारे चित्रपट पाहणे हे अडचणीचे तसेच लज्जास्पद वाटते असं कबीर खान म्हणाला असून त्यावरुन नवीन वाद निर्माण झालेला असतानाच आता भाजपाच्या आमदाराने या वादात उडी घेतलीय. इतकच नाही तर यावरुन या भाजपा नेत्याने थेट राज्यातील सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधलाय.

हिंदी चित्रपटांमध्ये लोकप्रिय कथानकानुसार हे चित्रपट बनवले जातात तसेच ते ऐतिहासिक संदर्भांवर आधारित नसतात असा आक्षेपही कबीर खानने घेतलाय. तसेच मुघलांना चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकेत पाहून आपल्याला त्रास होतो अस कबीर म्हणालाय. न्यूयॉर्क, बजरंगी भाईजान सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या कबीर खानने नुकतीच एक मुलाखत दिली. मुघलांना कमी लेखणारे चित्रपट आपण सहन करु शकत नाही असं कबीर मुलाखती म्हणाला आहे. तसेच त्याने मुघल हे भारत घडवणारे खरे शासक होते असंही म्हटलं आहे.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कबीरने, “मला हे फार अडचणीचे आणि लज्जास्पद वाटते. कारण लोकप्रिय कथानकासाठी हे सारं केलं जात हे पाहून मला अस्वस्थ व्हायला होतं. निर्मात्याने काही मिळवलं असेल आणि त्याला एखादा मुद्दा सिद्ध करायचा असेल तर तो वेगळ्या विचारसरणीने तो मांडू शकतो. त्यामुळेच तुम्हाला मुघलांना कमी लेखायचं असेल तर त्यासंदर्भातही थोडं संशोधन करुन चित्रपट बनवले पाहिजे. तसेच मुघलांना कायम व्हिलन का दाखवलं जातं हे प्रेक्षकांना समजलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर इतिहास आणि संशोधन वाचलं तर मुघलांना नकारात्मक भूमिकेत का दाखवलं हा फार कठीण प्रश्न वाटतो. माझ्या मते ते देश घडवणारे खरे शासक होते. मात्र त्यांनी लोकांच्या हत्या घडवून आणल्या असं तुम्ही म्हणत असाल तर ते कशाच्या आधारे म्हणताय हे दाखवलं पाहिजे. नुसतं बोलून मोकळं होणं योग्य नाही. यावर खुली चर्चा करा. एखादं कथानक लोकप्रिय होईल म्हणून त्यानुसार कथानक रचू नका,” असं मत व्यक्त केलं आहे.

“भारताच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या कालावधीत होऊन गेलेल्या मुघल आणि इतर मुस्लीम शासकांना कमी लेखण्याचं काम आज फार सोप्प आहे. साचेबद्ध मांडणीमध्ये त्यांना अडकवणं हे मला फार त्रासदायक वाटतं. दुर्देवाने मला असं कथानक असणाऱ्या चित्रपटांबद्दल आदर वाटत नाही. अर्थात हे माझं खासगी मत आहे. मी बहुसंख्य प्रेक्षकांसाठी मत व्यक्त करु शकत नाही मात्र मला नक्कीच अशापद्धतीचं कथानक पाहिल्यावर त्रास होतो,” असं कबीरने पुढे बोलताना म्हटलं आहे. मात्र आता या वक्तव्यावरुन भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी कबीर खानला टोला लगावला आहे.

भातखळकर यांनी ट्विटरवरुन कबीर खानच्या वक्तव्याचा निषेध केलाय. “मुघलांना नकारात्मक भूमिकेत पाहून त्रास होतो” हे चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांचे वक्तव्य बाटग्या मानसिकतेचे द्योतक आहे,” असं भातखळकर म्हणाले आहेत. तसेच “कबीर खान यांना बरे वाटावे म्हणून इतिहास बदलता येत नाही. राज्यात ब्रिगेडी इतिहासकार सत्तेवर बसल्याचे परीणाम आहेत,” असं म्हणत भातळखकर यांनी थेट सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.

दरम्यान, मागील काही वर्षांमध्ये ‘पद्मावत’, ‘पानीपत’, ‘तान्हाजी’ यासारख्या चित्रपटामध्ये मुघल शासकांबद्दलचं कथानक दाखवण्यात आलंय. ‘तान्हाजी’मध्ये नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खाननेही गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवल्या गेल्याचं म्हटलं होतं. सैफने फिल्म कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये, “काही कारणासाठी मी उघडपणे भूमिका घेतली नाही. कदाचित मी पुढील वेळेस भूमिक घेईल. मात्र ही भूमिका साकारताना मला फार आनंद झाला. मात्र लोक जेव्हा याचा इतिहास असं म्हणतात तेव्हा मला तो इतिहास वाटत नाही. इतिहास काय आहे मला माहितीय,” असं म्हटलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Atul bhatkhalkar slams state government over comment of maharashtra for kabir khan comment on mughals scsg

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या