scorecardresearch

उसाच्या उत्पादनात यंदा सरासरी १५ टक्के घट; हवामान बदलाचा फटका

ऊस लागवडीसाठी चांगले वातावरण निर्माण झाले व उसाचे चांगले उत्पादन होऊ लागले.

उसाच्या उत्पादनात यंदा सरासरी १५ टक्के घट; हवामान बदलाचा फटका
(संग्रहित छायाचित्र)

प्रदीप नणंदकर

लातूर : गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रासह देशभर चांगला पाऊस होत असल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. परिणामी ऊस लागवडीसाठी चांगले वातावरण निर्माण झाले व उसाचे चांगले उत्पादन होऊ लागले. मात्र यावर्षी हवामान बदलाचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून सरासरी १५ टक्क्यांची घट महाराष्ट्रात होईल असा जाणकाराचा अंदाज आहे.

गतवर्षी गेल्या पन्नास वर्षांत सर्वाधिक उसाचे उत्पादन झाले. वातावरणाचा चांगला लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला. एकरी उत्पादकता वाढली, उसाच्या उत्पादनात २५ ते ३५ टक्केपर्यंत वाढ झाली. महाराष्ट्रात तर ती सर्वाधिक ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली .गतवर्षी महाराष्ट्रात १३८ लाख टन ऊस उत्पादन झाले व देशात ३६० लाख टन उत्पादन झाले. उसाच्या लागवडीत वाढ होत असल्याने साखर कारखान्यांनी आपल्या गाळप क्षमतेमध्ये वाढ करत आता दैनंदिन गाळप क्षमता  साडेआठ लाख टनापर्यंत पोहोचली आहे.

यावर्षी जून, जुलै महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही व त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीत प्रचंड पाऊस झाला, सूर्यदर्शन झाले नाही त्यामुळे उसाच्या वाढीसाठी जे आवश्यक वातावरण होते ते मिळाले नाही.  उसाची वाढ खुंटली. महाराष्ट्राची ऊस उत्पादकता सरासरी ८०ते ८५ टन आहे. गतवर्षी वाढ झाल्यामुळे ती ११० टनांपर्यंत पोहोचली होती. मराठवाडय़ात ६० ते ६५   टक्के वाढ झाली होती. नॅचरल शुगरच्या परिसरात १२० टन प्रति हेक्टरी उत्पादन झाले. 

यावर्षी उसाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात सुमारे एक लाख हेक्टर वर जास्तीची लागवड झाली असून महाराष्ट्राचे एकूण उसाचे क्षेत्र हे १५ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. शासनाने यावर्षीचा अंदाजही १३८ लाख टन उसाचे उत्पादन होईल असा व्यक्त केला आहे .विस्मा संघटनेनेही १३७ लाख टन उसाचे उत्पादन यावर्षीच्या हंगामात होईल असा अंदाज व्यक्त केला आहे .मात्र वस्तुस्थिती भिन्न दिसते आहे .यावर्षी अतिशय मोठय़ा प्रमाणात उसाचे क्षेत्र घटले आहे .उच्च साखर उतारा मिळणाऱ्या कोल्हापूर परिसरात उसाच्या उत्पादनात दहा टक्के घट आहे. मध्यम साखर उतारा मिळणाऱ्या पुणे, नगर, सोलापूर या क्षेत्रातील घट ही पंधरा टक्क्यापर्यंत आहे, तर विदर्भ, मराठवाडा व खानदेश ज्या ठिकाणी कमी साखर उतारा असतो त्या ठिकाणच्या ऊस उत्पादनातील घट ही २५ ते ३० टक्क्यापर्यंत आहे. त्यामुळे सरासरी महाराष्ट्राच्या उसाच्या उत्पादनात १५ टक्क्यांपर्यंत घट अपेक्षित आहे.  परिणामी  १२० लाख टन इतकेच उसाचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. त्यामुळेच साखर उत्पादनामध्ये घट होणे अपेक्षित आहे.

केंद्र सरकारने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचा परवाना दिल्यामुळे गतवर्षी १२ लाख टन साखरेच्या उत्पादनाच्या ऐवजी इथेनॉलचे उत्पादन झाले. यावर्षी पंधरा लाख टन इथेनॉलचे उत्पादन होईल असा अंदाज असला, तरी इथेनॉलचे भाव वाढल्यामुळे १८ लाख टन उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळेच साखरेच्या उत्पादनात घट होणार आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस अधिकृत आकडेवारीही उपलब्ध होईल .ज्याप्रमाणे महाराष्ट्रात उसाच्या उत्पादनात घट आहे तीच परिस्थिती कर्नाटक, गुजरात व उत्तर प्रदेशात होईल असा अंदाज आहे. देशात एकूण उत्पादनात साखरेच्या दहा ते पंधरा टक्के घट अपेक्षित आहे. या घटीमुळे ऊस उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत सापडला आहे .

गतवर्षी हवामान बदलाचे पोषक वातावरण होते, त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांत सर्वाधिक उसाचे उत्पादन शेतकऱ्याला घेता आले. मात्र यावर्षी हवामान बदलाचा फटका बसल्याने उसाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे .साखर गाळपास येणाऱ्या उसावरून हा अंदाज येत असून याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा  लागणार आहे.

–  बी.बी .ठोंबरे, कार्यकारी संचालक नॅचरल शुगर, रांजणी

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या