गोंदिया : शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून गणल्या जाणाऱ्या सारसांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी गोंदिया जिल्ह्यातील काही सुज्ञ तरुणांनी स्वीकारली आहे. गोंदिया, बालाघाट व भंडारा या तीन जिल्ह्यांतील ‘सारस स्केप’ मधील ७८ गावांत सारस बचावासाठी या तरुणांनी सेवा संस्था निर्माण केली. या संस्थेच्या माध्यमातून सदस्यांनी गावागावांतील नागरिकांना सारस संवर्धनासाठी लोकचळवळ उभी केली आहे. महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्ह्यात सारस पक्षी पाहायला मिळतो. १७ वर्षांपूर्वी अत्यल्प असलेली सारसांची संख्या आता बऱ्यापैकी वाढली आहे. गोंदिया, भंडारा व मध्यप्रदेशच्या बालाघाट या तीन जिल्ह्यांतील सारस स्केपमधील संख्या आजघडीला ८० ते ८५ च्या दरम्यान आहे. या तीन जिल्ह्यांत सारसांचा अधिवास असल्याने या गावांमधील लोकांना सारसाचे महत्त्व पटवून देण्याबरोबर त्यांचे संवर्धन कसे करावे, हे सांगण्यासाठी सेवा संस्थेचे तरुण गावागावांत पोहोचत आहेत. मागील नऊ वर्षांपासून सेवा संस्थेच्या अविरत कार्यामुळे गावागावांत सारस संवर्धनासाठी आता नागिरकही पुढाकार घेत आहेत. सारस संवर्धनासाठी सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार, मुनेश गौतम, अभिजीत परिहार, अभय कोचर, भरत जसानी, मुकुंद धुर्वे, दुष्यंत रेभे, अंकित ठाकूर, प्रशांत लाडेकर, बबलू चुटे, राकेश डोये, दुष्यंत आकरे, अशोक पडोळे, डेलेंद्र हरिणखेडे, प्रवीण मेंढे, जलाराम बुधेवार, विशाल कटरे, कन्हैया उदापुरे, मोहन राणा, सलीम शेख, पिंटू वंजारी, रतिराम क्षीरसागर, रुचीर देशमुख, अनुराग शुक्ला असे अनेक तरुण परिश्रम घेत आहेत. शासन व प्रशासनाचे मात्र याकडे काहीसे दुर्लक्ष होत आहे. सेवा संस्थेच्या कार्याला शासनाच्या कार्याची जोड मिळाल्यास सारस संवर्धन जोमाने होईल. सारस पक्ष्यामुळे गोंदियाचे नाव जगभरात पोहोचले आहे.

जेव्हा सारस बचाव अभियानाची सुरुवात झाली तेव्हा गावागावांत किंवा शासनस्तरावर जनजागृती होत नव्हती. सारसांचे महत्त्व त्यावेळी कळत नव्हते. आता ते कळू लागले आहे. शासनही याकडे लक्ष देत आहे. आमचे स्वयंसेवक न थकता मागील अनेक वर्षांपासून नियमित कार्य करीत आहेत. हे कार्य पुढे सुरूच राहील.

सावन बहेकार