संजीव कुळकर्णी

महात्मा गांधी यांच्या नात सुमित्रा कुलकर्णी यांनी १९९० च्या सुमारास तीन खंडांमध्ये साकारलेले आपल्या आजोबांचे चरित्र त्या वेळी सजग वाचकांच्या पसंतीस उतरले होते; पण मूळ हिंदीतील या चरित्राचा मराठी अनुवाद ग्रंथबद्ध होण्यास गांधीजींच्या कर्मभूमीत म्हणजे, महाराष्ट्रात तब्बल ३० वर्षे लागली. त्यानंतर राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागासह संबंधितांच्या अनास्थेमुळे हे त्रिखंडात्मक चरित्र वाचकांना सहज उपलब्ध होण्याची व्यवस्था झालेली नाही.

सध्या बंगळूरु येथे स्थायिक असलेल्या सुमित्रा कुलकर्णी यांचे हिंदी भाषेतील ‘अनमोल विरासत’ हे त्रिखंडात्मक गांधी चरित्र नवी दिल्लीतील एका प्रकाशन संस्थेने १९८८ साली प्रसिद्ध केले. पुढे ध्येयवादी संपादक अनंतराव भालेराव यांनी हे त्रिखंडात्मक चरित्र वाचल्यावर त्यातील वेगळेपण त्यांना भावले आणि मग हे चरित्र मराठी भाषेत वाचकांसमोर यावे, यासाठी त्यांनी त्या काळातच पुढाकार घेतला. ऑक्टोबर १९९१ मध्ये अनंतरावांचे निधन झाले; पण तत्पूर्वी त्यांनी ‘अनमोल विरासत’च्या अनुवादाची जबाबदारी आपले साहित्यिक मित्र, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ प्रा. भगवंतराव देशमुख यांच्यावर सोपविली. त्यानुसार भगवंतरावांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवातही केली. अनंतरावांच्या निधनानंतर वरील चरित्र मराठीत कोण प्रकाशित करणार, ते निश्चित झाले नव्हते; पण महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने चरित्र प्रकाशनास तत्त्वत: मान्यता दिलेली होती. भगवंतरावांनी १९९० च्या दशकाच्या अखेरीस भाषांतराचे काम पूर्ण केले. दरम्यान, २००९ साली भगवंतरावांचे औरंगाबादेत निधन झाल्यामुळे वरील हस्तलिखिताचे ग्रंथात रूपांतर होण्यासंदर्भातील प्रक्रियाच ठप्प झाली. साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षीय कारकीर्दीत बाबा भांड यांच्या पुढाकाराने हा ग्रंथ तयार झाला.

झाले काय?  :तीन खंडांतील ‘अनमोल विरासत’च्या मराठी अनुवादाला ‘अनमोल वारसा’ असे शीर्षक भाषांतरकार व प्रकाशक यांनी दिले आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दीडशेव्या वर्षांत म्हणजे जानेवारी २०२० च्या सुमारास गांधी चरित्राचे तीन खंड छापखान्यातून बाहेर आले. परंतु महाराष्ट्र सरकार आणि या सरकारच्या मराठी भाषा विभागाने ‘अनमोल वारसा’च्या प्रकाशनाच्या निमित्ताने सरकारी पातळीवर कोणताही कार्यक्रम केला नाही. महात्मा गांधी यांनी महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानले. मात्र या कर्मभूमीतच सरकारी अनास्थेमुळे त्यांच्या चरित्र ग्रंथाची परवड झाल्याचे दिसून येत आहे.