१८ हजार आयुर्वेदिक डॉक्टरांची यादी संघटनेकडून जाहीर

राज्यात १८ हजारांवर आयुर्वेदिक डॉक्टर परवान्याचे नूतनीकरण न करताच  व्यवसाय करीत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ  इंडियन मेडिसिन (एमसीआयएम) या भारतीय औषधोपचार पध्दतीच्या शिखर संघटनेने परवाना असलेल्या परंतु त्याचे नूतनीकरण न करणाऱ्या डॉक्टरांची यादी प्रसिध्द केली आहे. आयुर्वेद, युनानी व तत्सम शाखेच्या डॉक्टरांच्या या यादीत अठरा हजार डॉक्टर हे आयुर्वेदिक शाखेतील आहे. त्यात खासगी व्यवसाय तसेच शासकीय सेवेत असणाऱ्यांचाही समावेश आहे. राज्यात आयुर्वेदिक डॉक्टरांची संख्या ८० हजारांच्या घरात जाते. त्यातील ही संख्या निश्चितच लक्षणीय असल्याने गंभीर बाब ठरते.

परवाना असणाऱ्या वाहनचालकाच्या हातून अपघातात कुणी मृत्युमुखी पडल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. पण परवाना नसल्यास खुनाचे प्रकरण म्हणून चौकशी होते. तसाच हा प्रकार आहे. असे या शाखेतील एका वरिष्ठाने गांभीर्य स्पष्ट करताना नमूद केले. परवान्याचे नूतनीकरण न करणाऱ्या या डॉक्टरांची ही संख्या फ सवी असू शकते. कारण संघटनेकडून परवान्याबाबत टाकलेली पत्रे जुन्याच पत्त्यावर जातात. मिळत नाही. काहींचे निधन झाले किंवा काही परप्रांतात जाण्याची शक्यता सांगितली जाते. दर पाच वर्षांनी ही नूतनीकरणाची प्रक्रिया पार पाडावी लागते. मात्र यादीचे अवलोकन केल्यास असंख्य डॉक्टरांनी तब्बल २० वर्षांपासूनच नूतनीकरणात उदासिनता दाखविल्याचे दिसून येते. ही प्रक्रिया किचकट असल्याचे सांगत एका पदाधिकाऱ्याने नूतनीकरण संगणकीय करण्याचा प्रस्ताव शासनास दिल्याचे निदर्शनास आणले. १९६१ च्या ‘मेडिकल प्रॅक्टीशनर अ‍ॅक्ट’मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव दिला. पण या कायदा बदलास अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. वर्षभरात सुधारणा होण्याची अपेक्षा केली जाते. ऑनलाईन नूतनीकरण झाल्यासच अधिकृत नोंद शक्य होईल. अन्यथा वडिलांच्या परवान्यावर मुलाने व्यवसाय करण्याचे प्रकार सुरूच राहतील, अशी टिपणीही या पदाधिकाऱ्याने केली.

पूर्व खबरदारी म्हणून संबंधित डॉक्टरांच्या जिल्ह्य़ातील जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना अशा डॉक्टरांबाबत पूर्वसूचित करण्यात येते. पण हातून दुर्घटना घडल्यास परवाना नसणाऱ्यांवर बेतू शकते. शिवाय बोगस डॉक्टर ओळखणे शक्य व्हावे म्हणूनही नूतनीकरण करणे आवश्यक ठरत असल्याची प्रतिक्रिया मिळाली.

परवान्याचे नूतनीकरण न करता व्यवसाय करणे ही बाब कायदेशीर अडचण निर्माण करू शकते. प्रत्येकाने नूतनीकरण करणे आवश्यक ठरते. या प्रक्रियेत बदल करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. आम्ही वारंवार पत्रे टाकली. स्मरण दिले, पण प्रतिसाद नाही.

– डॉ. आशुतोष गुप्ता, ‘एमसीआयएम’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष