आपला माणूस आपला राहिला नाही अशी भावना केवळ शिवसैनिकांतच नाही तर सामान्यजनांतूनही व्यक्त होऊ लागल्याने खासदार भाऊसाहेब वाकचौरेंपुढील समस्या वाढल्या आहेत. दुसरीकडे बबनराव घोलप शिवसैनिकांना आपले वाटायचे तसे सदाशिव लोखंडे वाटत नाहीत आणि सामान्यजनांनाही ते अपरिचित वाटतात. या पार्श्र्वभूमीवर अपवाद वगळता निवडणूक आहे की नाही अशीच तालुक्यातील स्थिती आहे. या उदासीनतेचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसचा बालेकिल्ला समजण्यात येणा-या या मतदारसंघाने मागच्या वेळी आठवले नकोत, या मानसिकतेतून पक्षाचा विचार न करता आपला माणूस म्हणून शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरेंची पाठराखण केली. खासदार झाल्यानंतर वाकचौरेंनी सभामंडपांच्या माध्यमातून मतदारसंघात कामे केली. मात्र शिवसेना म्हणून पक्षवाढीकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले किंबहुना निष्ठावंतांना डावलून त्यांनी अनेक कार्यक्रम घेतल्याने शिवसेनेत ते कायम संशयग्रस्त राहिले. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसची वाट धरल्याने सेनापती नसलेल्या सैन्यासारखी शिवसेनेची अवस्था झाली. गद्दार हा शब्द मराठी माणसाच्या सहजी पचनी पडत नाही. त्यामुळेच वाकचौरेंच्या गद्दारीने शिवसैनिक चवताळले. संगमनेरात त्यांना मारहाण होण्यापर्यंत प्रकरण चिघळले.
संगमनेरातील मारहाण नाटय़ाचा फायदा वाकचौरेंना सहानुभूती मिळण्यात होईल हा काँग्रेसजनांचा होरा मात्र सपशेल फोल ठरला. उलट मारहाण करणारेच भाव खाऊन गेले. सामान्यजनांना या घटनेचे फारसे आश्चर्य वाटले नाही, येथेच आपला माणूस ही वाकचौरेंची प्रतिमा गळून पडल्याचे मानण्यात येते. गतवेळी वाकचौरेंसाठी मूकसंमती देणारे अथवा पडद्याआडून पाठिंबा देणारे काँग्रेसजन आता उघडपणे त्यांच्या व्यासपीठावर असतील हीच त्यांच्यासाठीची जमेची बाजू आहे. मात्र थोरात, विखे व पिचड या मंत्र्यांवरच आता त्यांची सारी मदार आहे. स्वतंत्रपणे राबविण्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणाही नाही. संगमनेरचा विचार करता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नेहमीच पक्षाच्या निर्णयासोबत राहिले आहेत. वाकचौरेंच्या प्रचारासाठी त्यांनी तालुक्याच्या विविध भागांचा दोनदा दौराही केला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, दिलीप शिंदे आदी मंडळी प्रचारात आहेत मात्र कार्यकर्त्यांच्या आघाडीवर निरुत्साह जाणवतो.
सेनेच्या लोखंडे यांच्याही प्रचाराबाबत आलबेलच आहे. आमदार नीलम गो-हे तालुक्यात येऊन गेल्या, शिवसैनिकही पुन्हा कामाला लागल्याचे चित्र आहे. मात्र घोलप असताना दिसणारा शिवसैनिकांचा जोश, आक्रमकपणा काहीसा मावळलेला दिसतो. सैरभैर झालेल्या सैन्यासारखी त्यांची स्थिती आहे. अचानक उमेदवारी मिळाल्याने वेळेची मर्यादा, पक्ष म्हणून असलेल्या ताकदीच्या मर्यादा, उमेदवार बदलामुळे कार्यकर्त्यांत आलेली मरगळ, गटबाजी ही लोखंडेंसमोरील सध्याची आव्हाने आहेत. एकंदरीत दोन्ही प्रमुख उमेदवार व त्यांच्या प्रचाराच्या आघाडय़ांवर दिसत असलेला आत्मविश्वासाचा अभाव सामान्यजनांच्या उदासीनतेस कारणीभूत ठरणारा आहे. त्यामुळेच तालुक्यात निवडणुकीचे म्हणून असे वातावरण निर्माण झालेले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2014 रोजी प्रकाशित
उमेदवारांची प्रतिमाही उदासीनतेला पोषक
आपला माणूस आपला राहिला नाही अशी भावना केवळ शिवसैनिकांतच नाही तर सामान्यजनांतूनही व्यक्त होऊ लागल्याने खासदार भाऊसाहेब वाकचौरेंपुढील समस्या वाढल्या आहेत.
First published on: 04-04-2014 at 01:23 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Background of election indifferent atmosphere in sangamner