सांगली येथील महिला वनपरिक्षेत्र अधिकारी विनयभंग प्रकरणात सांगली जिल्हा न्यायालयाने उपवनसंरक्षक विजय माने यांना जामीन मंजूर केला आहे. विनयभंग प्रकरणी या महिला अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर माने यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
मे महिन्यात हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा मेळघाट महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दिवंगत दीपाली चव्हाण प्रकरणाची उजळणी होते की काय असे सर्वांना वाटले. मात्र, सांगली येथील या महिला अधिकाऱ्याने उपवनसंरक्षक माने यांच्या विरोधात थेट पोलिसात तक्रार दाखल केली. वनपरिक्षेत्र अधिकारी तीच्या पाठिशी उभे असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळाले नाही. याचाच फायदा घेत माने यांच्याकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. संघटनांकडून दबाव आल्यानंतर माने यांच्याकडून उपवनसंरक्षक पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला होता. त्यानंतर चंद्रपूर येथे माने यांची बदली करण्यात आली. त्या महिला अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना न्यायासाठी साकडे घातले. महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली, पण कुणीही दखल घेतली नाही. वनखात्याच्या अंतर्गत समिती कडूनही निराशा पदरी पडली. आता विजय माने यांना जामीन मिळाल्याने महिला अधिकाऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.