सिन्नर तालुक्यातील शहा येथील शेवगा उत्पादक बाळासाहेब मराळे यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक कृषिगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. या पुरस्कारासाठी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडय़ातील पाच प्रयोगशील शेतकरी व दोन कृषी शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातून मराळे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षांतील ३४वा स्मृतिदिन कार्यक्रम १८ ऑगस्ट रोजी पुसद येथे होणार असून या वेळी पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. मराळे यांनी सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्यात अत्यंत कमी पाण्यात शेवगा शेती फायदेशीर ठरू शकते हे सप्रयोग सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी आपल्या शेतीत संशोधन करून निवड पद्धतीने ‘रोहित-१’ हे वाण शोधून काढले. महाराष्ट्रासह विविध राज्यांमधील शेतकरी शेवगा लागवडीसाठी मराळे यांचे मार्गदर्शन घेत असून त्यांची या विषयावर दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.