केंद्र सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी तोंडाला काळ्यापट्ट्या लावून आज विधान भवन परिसरात आंदोलन केलंय. विरोधकांची मुस्कटदाबी होतेय, देशात हुकूमशाही असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. विशेष म्हणजे विधानसभेतही आज विरोधकांनी सभात्याग केला आहे. सभात्याग केल्यानंतर विरोधकांनी विधान भवन परिसरातून संयुक्त पत्रकार परिषद घेतली असून, सरकारला खडे बोल सुनावलेत. आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधींची अवहेलना करणारी घोषणा आणि कृती चालली होती. ती अत्यंत निषेधार्ह अशा प्रकारची आहे. आज आमचे राष्ट्रीय नेते आहेत, उद्या त्यांच्याकडेही राष्ट्रीय नेते आहेत. आज आमच्याकडेसुद्धा पायताणं आहेत हे विसरून चालणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करता अध्यक्षांनी कडक अशी कारवाई करावी, असा आग्रह आम्ही धरलेला होता, असंही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणालेत. बाळासाहेब थोरात विधान भवन परिसरातून माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.

आमच्या काही सदस्यांकडून चुकलं असेल तर त्यांच्यावरही कारवाई करा, परंतु ही जी नवी पद्धत पडते आहे, त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने पुढेही घडण्याची शक्यता आहे. म्हणून आपण हे कुठे तरी बंद केलं पाहिजे. हे कृत्य ज्यांनी केलं, त्यांना शिक्षा केली पाहिजे, असा आग्रह आम्ही धरलेला होता. ही जबाबदारी अध्यक्षांची आहे, त्यांनी निरपेक्ष राहिले पाहिजे आणि निरपेक्ष राहून निर्णय दिले पाहिजेत. आपल्या प्रांगणात काही चुकीचं घडत असल्यास त्याची जबाबदारी अध्यक्षांची असते. परंतु अध्यक्ष टाळाटाळ करीत असल्याचं आम्हाला दिसतंय. मराठवाडा मुक्ति संग्रामासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलवावं, अशी अशोक चव्हाणांची जी सूचना आहे. ती सरकारनं मान्य करायला हवी. सरकारची नकारात्मक भूमिका ही आपल्या परंपरेला साजेशी नाही. म्हणून आम्ही सभात्याग केलेला असल्याचंही बाळासाहेब थोरातांनी सांगितलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभेच्या अधिवेशनात पायऱ्यांवर बसून जनतेच्या ज्या मागण्या आहेत, ज्यांचे जे प्रश्न आहेत, ते मांडण्याची एक पद्धत आहे, एक आंदोलन आपण करत असतो आणि ती सर्व वर्षानुवर्षे चाललेली गोष्ट आहे. आता सध्या आम्ही आंदोलन करतो, कधी ते आंदोलन करीत होते ही वेगळी गोष्ट नाही. परंतु ते कसं असावं याबाबतीतही काही संकेत आहेत. पण दुर्दैवानं दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते आपल्या विधानसभेच्या इतिहासात दुर्दैवी अशी गोष्ट आहे, असंही बाळासाहेब थोरातांनी अधोरेखित केलं आहे.