उद्यापासून ऑनलाइन परवानावाटप सुरू

बालभारतीच्या पुस्तकांचे स्वामित्वहक्क (कॉपीराइट) घेण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणामुळे बालभारतीची आठ माध्यमांतील सर्व विषय आणि सर्व इयत्तांची पुस्तके आता सुरक्षित होणार आहेत. या धोरणांतर्गत सोमवारपासून ऑनलाइन परवानावाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी दिली.

दहावीचे नवे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच ते समाजमाध्यमांतून पसरले होते. या पाश्र्वभूमीवर विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बालभारतीच्या पुस्तकांचे स्वामित्वहक्क घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर बालभारतीकडून स्वामित्वहक्क घेण्यासंबंधीचे धोरण ठरवण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या कोणत्याही पुस्तकांचा वापर मुद्रित, ऑनलाइन किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये बालभारतीच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. धोरण जाहीर झाल्यानंतर त्याबाबतचा सविस्तर तपशील कळणार आहे.

‘बालभारतीसाठी स्वामित्वहक्क धोरण ठरवणे महत्त्वाचे होते. स्वामित्वहक्क आणि या धोरणामुळे बालभारतीच्या पुस्तकांना सुरक्षितता प्राप्त होणार आहे. हे धोरण जाहीर करण्यात येणार असून, सोमवारपासून ऑनलाइन पद्धतीने परवानावाटप केले जाणार आहे. ज्यांना हे परवाने मिळतील, त्यांना या पुस्तकांचा वापर करता येईल,’ असे मगर यांनी स्पष्ट केले.

आठवीची पुस्तकेही समाजमाध्यमांवर

इयत्ता दहावीची पुस्तके प्रकाशित झाल्यावर समाजमाध्यमांमध्ये आल्याचा प्रकार ताजा असतानाच आठवीची पुस्तके प्रकाशित होण्यापूर्वीच समाजमाध्यमांत आल्याचा आरोप आहे. याबाबतही मगर यांनी स्पष्टीकरण दिले. ‘दहावीच्या पुस्तकांबाबत झालेला प्रकार हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता. त्याबाबतची तक्रार दादर पोलीस ठाण्यातील सायबर विभागाकडे करण्यात आली आहे. त्या प्रकारातील काही लोकांचे भ्रमणध्वनी पोलिसांनी जप्त केले आहेत. त्या प्रकाराचा तपास सुरू असल्याने अधिक काही बोलता येणार नाही. मात्र दोषींवर कारवाई केली जाईल. आठवीच्या पुस्तकांच्या बाबतीत तसा प्रकार झालेला नाही. आठवीची पुस्तके प्रकाशित झाल्यानंतर त्याची पीडीएफ करण्यात आली आहे. आता पीडीएफ करणे सहज शक्य आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.