मुंबई उच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर बंदी आणली असतानाही वनखात्याच्या आशीर्वादाने बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. न्यायालयाच्या बंदी आदेशाला झटका देत कागद रंगविणाऱ्या वनखात्याच्या आशीर्वादाने आंबोली वन चेक नाक्यावरून काल (शनिवारी) मध्यरात्री जळाऊ लाकडाचे २३ ट्रक बेळगावात जाऊ देण्यात आले. त्यामुळे पर्यावरणप्रेमींत नाराजी असून, वनशक्ती संस्था मुंबई उच्च न्यायालयात ही वस्तुस्थिती येत्या सुनावणीत मांडणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने वृक्षतोडीस बंदी आणली आहे. हा बंदी आदेश अद्याप असून, वनशक्ती संस्थेने त्याबाबत माहिती अधिकारात पुरावे सादर केले आहेत. न्यायालयाच्या बंदी आदेशाच्या पूर्वीची २० एप्रिल २०१२ ची तारीख पासकामासाठी दाखवून सध्या वाहतूक पास देऊन सर्व लाकूड बेळगाव, कोल्हापूर भागांत नेले जात आहे.
आंबोली वनखात्याच्या चेक नाक्यावर १८ जानेवारीपर्यंत वाहतूक पास असणारा एक ट्रक थांबला होता. त्याबाबत वनरक्षक कदम यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्या ठिकाणी पत्रकारांनी बंदी आदेश असताना बेसुमार वृक्षतोड कशी झाली, असा प्रश्न विचारल्यावर सुरुवातीला कदम यांनी उत्तरे देण्यास टाळाटाळ केली.
आंबोली वनखात्याच्या चेक पोस्टवर रात्री नऊ ते दहा या एका तासाच्या काळात २३ जळाऊ लाकूड वाहतूक करणारे ट्रक पास चेकिंगसाठी थांबले होते. दरम्यान, वनसंरक्षक मुंडे, साहाय्यक वनसंरक्षक पाटील यांनी पास तपासून पंचनामे करण्यात येतील, असे बोलताना सांगूनही बिनबोभाट जळाऊ लाकूड निर्यात केली.
न्यायालयाच्या आदेशापूर्वीचे २० एप्रिल २०१२चे पासकाम करून जळाऊ लाकूड तब्बल दहा महिन्यांनी वाहतूक केले जात होते. लाखो रुपयांचा हा सौदा न्यायालयाच्या आदेशाला पर्याय शोधणारा ठरला असल्याचे बोलले जाते. पास काम व वृक्षतोड या दोन भिन्न गोष्टी या प्रकरणात करण्यात आल्याचे जाणकारांनी सांगितले.
गोठोस, चराठा, इन्सुली, दिघवळे, बांदा, कुणकेरी, देवसू, खडपडे, घारपी, मालवण, हिलॉक अशा विविध जंगलांतील जळाऊ लाकूड असल्याचे आंबोली वन चेक नाक्याचे वनरक्षक कदम यांनी सांगितले. पासकाम असल्याने हे ट्रक पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बेसुमार वृक्षतोड करून गोवा, बेळगाव या सीमावर्ती राज्यातील भागांत दररोज जळाऊ व इमारतीयोग्य लाकूड नेण्यात येते, अशी चर्चा होती. न्यायालयाचा आदेश बंदी अनिर्णीत क्षेत्र व वनसंज्ञा क्षेत्रातील ही बेसुमार वृक्षतोड वनखाते व महसूल खात्याच्या आशीर्वादाने सुरू आहे, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
आंबोलीत पत्रकारांच्या दक्षतेमुळे जळाऊ लाकडाचे २३ ट्रक एका तासात  चौकशीसाठी थांबविण्यात आले, पण त्यांची सखोल चौकशी टाळत ते तातडीने बेळगावात नेण्यात आले. दररोज ३० ट्रक जळाऊ लाकूड बेळगाव व गोवा राज्यात नेण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.
उपवनसंरक्षक तुकाराम साळुंखे मुख्यालयात नव्हते. साहाय्यक वनसंरक्षक पाटील व कोल्हापूर वनसंरक्षक मुंडे, साहाय्यक वनसंरक्षक बागेवाडी, तहसीलदार विकास पाटील यांनी आपण लक्ष घालतो, असे सांगूनही लाकडाचे ट्रक जाऊ दिले. राजकीय दबाव व सौदेबाजीचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आंबोली वन चौकीत पास चेकिंगसाठी ट्रक थांबविले जात असले तरी या चौक्या नाममात्र ठरल्या आहेत. लाखो रुपयांचे संशयास्पद जळाऊ लाकूड नेणाऱ्या ट्रकना वनखात्याने अभय दिल्याने त्यांची उलटसुलट चर्चा सुरू होती.