वैतरणा नदीवर असलेल्या पुलाजवळून जलवाहतूक करण्यासाठी प्रशासनाने बंदी घातली आहे. या पुलाजवळ केल्या जाणाऱ्या रेती उत्खननावर नियंत्रण आणण्याठी आणि पुलाची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केला आहे. पूल क्रमांक ९२ व ९३च्या दोन्ही बाजूंस ६०० मीटर अंतरावर जलवाहतूक करण्यासाठी बंदी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून वैतरणा नदीवर असलेल्या रेल्वे पुलालगत गैरमार्गाने रेती उत्खनन केले जायचे. त्यामुळे पुलाच्या परिसराची खोली वाढली असून नदीच्या पात्राची रुंदीही वाढली. त्यामुळे वैतरणा नदीवरील पूल क्रमांक ९२ व ९३ यांना धोका पोहोचण्याची शक्यता पश्चिम रेल्वेच्या मुख्य अभियंत्यांनी पाहणीदरम्यान व्यक्त केली. या पुलांची सुरक्षितता राखण्यासाठी त्यांच्या दोन्ही बाजूला ६०० मीटर परिसरात पोलीस विभाग, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, नौदल, मत्स्यव्यवसाय विभाग, वन विभाग, तटरक्षक दल, उत्पादन शुल्क विभाग आदी शासकीय विभाग वगळून इतर कुणालाही जलवाहतूक करता येणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. हे मनाई आदेश २७ नोव्हेंबर २०१९ ते २४ जानेवारी २०२०पर्यंत जारी करण्यात आले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी होत असल्याची तपासणी करण्यासाठी पालघर पोलिसांकडून दोन्ही पुलांवर ग्रस्त ठेवण्याच्या सूचना पालघर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले असून या मनाई आदेशामुळे पुलाखालून मासेमारी करणाऱ्या किंवा रेतीची वाहतूक करणाऱ्या फायबर बोटींच्या वाहतुकीवर र्निबध आणले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारचे आदेश टप्प्यांमध्ये अनेकदा काढले जात असले तरी वैतरणा पुलालगत खासगी नौकांचा वावर रेल्वे गाडय़ांमधून प्रवास करताना दिसून येत असे. यापूर्वी वैतरणा पुलाखालून नौकानयन मार्ग बंद करण्यासाठी नायलॉन जाळ्या टाकण्यात आल्या होत्या. मात्र कालांतराने हा प्रयोगही अयशस्वी झाल्याचे दिसून आले होते.