केंद्र सरकारची योजना
 ‘गाव तेथे बँक, बँक तेथे ई-बँकिंग’ या केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्य सरकारने ज्या गावांमध्ये बँकिंग सेवा अद्याप पोचलेली नाही अशा गावातील लोकांना दैनंदिन आíथक व्यवहार बँकांशी करता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या वित्तीय समावेश योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘गाव तेथे बँक’ योजनेचा शुभारंभ राज्यात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्य़ातील कळंब तालुक्यातील परसाडी येथून सोमवार, १० फेब्रुवारीला होत आहे.
याच दिवशी जिल्ह्य़ातील २०० ग्रामपंचायतींमध्ये ही योजना लागू होत आहे.
 आता गावकऱ्यांना बँक व्यवहारासाठी गावाबाहेर जाण्याची गरज राहणार नाही, तर बँकच ग्रामपंचायतीत येणार आहे. ग्रामपंचायतीत एक संग्राम कक्ष स्थापन केला जाणार असून या केंद्रामार्फत वीज, दूरध्वनी, भ्रमणध्वनी आदींची देयके भरणे, रेल्वे व बस तिकिटांचे आरक्षण करणे, यासारख्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
ग्रामपंचायतींमध्ये ई-बँकिंगची सोय उपलब्ध करून दिल्याने ग्रामपंचायतींना काही रक्कम सेवाशुल्काच्या स्वरूपात मिळून ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
परसोडीतील नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, अर्थमंत्री पी.चिदंबरम, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी दिली.
 गावात गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी ठाण मांडून बसले आहेत. परिणामत जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले आहे.
परसोडी गावात ३५१ घरे असून, लोकसंख्या १५६२ आहे. गावातील प्रत्येक कुटुंबात झिरो बॅलन्सवर एक बँक खाते उघडण्यात येणार आहे. सध्या ही योजना कार्यान्वित करण्यासाठी बँक ऑफ बडोदाला प्राधिकृत एजंसी म्हणून सरकारने नियुक्त केले आहे.

विकासकामांना चालना -डॉ. कुळकर्णी
गावात बॅंकिंग सेवा पुरवली जाणार असल्याने कुटुंबातील सर्वच सज्ञान व्यक्तींचे बचत खाते बँकेत उघडले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून लोकांना बचतीची सवय लावणे व सर्व सरकारी अनुदान खऱ्या लाभार्थीपर्यंत पोहोचविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. ही एक महत्वाकांक्षी योजना असून, या माध्यमातून बँकांमध्ये बचतीच्या रूपाने मोठी रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी यांनी दिली.