गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत का नाहीत? या कारणावरून कृषी सहायकास गारपीटग्रस्तांनी शुक्रवारी बेदम मारहाण केली. हिंगोली तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी दहा शेतकऱ्यांवर गुन्हा नोंदवून अटक केली.
प्रकाश त्र्यंबकराव कावरखे असे मारहाण झालेल्या कृषी सहायकाचे नाव आहे. हिंगोली तालुक्यातील हिरडी येथील शेतकऱ्यांनी त्यांना मारहाण केली. दरम्यान, या प्रकाराच्या निषेधार्थ राज्य कृषी सहायक संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
कृषी सहायक कावरखे यांनी िहगोली शहर पोलिसात तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, संजय पुंजाजी थोरात (हिरडी) यांनी शुक्रवारी साडेदहाच्या सुमारास तहसील कार्यालयात बोलविले. त्याप्रमाणे कार्यालयात गेलो असता तेथे बरेच शेतकरी जमले होते. त्यापकी रमेश किशन थोरात याने आमच्या गावातील गारपीटग्रस्तांचे पसे द्या, अशी मागणी करीत आरडाओरडा सुरू केला. या दरम्यान उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांचे एकूण नुकसानीचे क्षेत्रफळ, त्यानुसार तयार केलेल्या याद्या तहसील कार्यालयाकडे दिल्या आहेत. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे यादीप्रमाणे पसे आले असून तुम्ही तहसील कार्यालयात संपर्क साधा. अनुदानाच्या यादीत नावाची खात्री करून घेण्यासाठी तलाठय़ाशी संपर्क साधा. एकूण प्रकरणात आपला काही संबंध येत नसल्याचे आपण सांगितले. मात्र, जमलेले लोक काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. या लोकांपैकी संजय पुंजाजी थोरात, शिवहरी किसन थोरात, गणेश काकडे, शिवहरी लांडगे, रामेश्वर काकडे, विश्वनाथ लांडगे, मोहन थोरात, देवबा पठाडे, रामेश्वर चवरघोडे व इतर (सर्व राहणार हिरडी) यांनी गोंधळ घालून आपणास शिवीगाळ करून, सर्वानी घेरून लाथा-बुक्क्यांनी तोंडावर, डोक्यावर, पाठीवर, पोटात मारहाण केली. त्यातच आमच्याविरोधात तक्रार दिल्यास तुझ्या परिवारास जिवंत ठेवणार नाही. तुला जिवे मारून टाकू, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, मारहाण सुरू असताना तहसील कार्यालयात तलाठी धाबे, कृषी सहाय्यक आर. के. जाधव, संजय परसराम, राठोड, आर. एन. कावरखे, व मदतनीस विठ्ठल जिजिबा जाधव, प्रकाश पांढरे व इतर कर्मचाऱ्यांनी मध्ये पडून आपणास वाचविले, असे कावरखे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
कावरखे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी मारोती थोरात, देवबा पठाडे, शिवहरी लांडगे, रामेश्वर थोरात, पांडुरंग थोरात, विश्वनाथ लांडगे, मोहन थोरात, गजानन चवरघोडे यांच्यासह दहाजणांना अटक केली.