लोकसभेच्या निवडणुकीतील नेत्यांच्या प्रचाराचे ताबूत मंगळवारी शांत झाले. दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची केलेली बीडची लढत राज्यात लक्षवेधी ठरली आहे.
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जिल्हय़ात विविध ठिकाणी सभा घेत वातावरण ढवळून काढले. राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेनंतर पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, उमेदवार धस यांनी प्रचारफेरी, बठकांचा धडाका लावत वातावरण कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. जाहीर सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने राजकीय वातावरण तापले.
मुंडे यांनी मंगळवारी परळीत बठक, गाठीभेटी, तर माजलगाव, बीड व कडा येथे वेगवेगळय़ा ठिकाणी जाहीर सभा घेऊन मत देण्याचे आवाहन केले. आमदार पंकजा पालवे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शहानवाझ हुसेन यांच्यासह प्रदेश स्तरावरील नेत्यांनी मुंडेंसाठी सभा घेतल्या. मुंडेंनी प्रत्येक तालुक्यात सभा घेऊन राष्ट्रवादीवर हल्ला चढवला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन मुक्काम व पाच सभा, तर अजित पवार यांनी तीन सभा घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. पालकमंत्री क्षीरसागर, आमदार अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. धस यांनी जि.प.च्या सर्व गटांत जाऊन प्रचारात रंग भरला. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रंगतदार झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून प्रचारात जीव ओतला. आता जाहीर प्रचार संपला असून खऱ्या अर्थाने कोणाला निवडून आणायचे याचा प्रचार सुरू झाला आहे.