“तुम्ही सत्तेसाठी मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलंय”, संजय राऊतांच्या टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर

“…तरच तुमचा भगवा खरा”, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिल्यानंतर आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीनंतर संजय राऊतांनी दिलेल्या आव्हानाला भाजपाचं प्रत्युत्तर (Photo : File)

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव करून भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. मात्र, या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत हे भाजपावर अत्यंत तीव्र शब्दांमध्ये टीका करताना दिसत आहेत. “मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता? लाज वाटत नाही का?”, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता राऊत यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं आहे. “बेळगाव महापालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. तरच तुमचा भगवा खरा”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांना आता भाजपाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना केशव उपाध्ये म्हणाले की, “महाराष्ट्रात विश्वासघाताने सत्ता मिळवून दोन वर्ष होतील. औरंगाबादचं संभाजीनगर झालं नाही. ते कधी होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्याला बांधावर मदत देऊ म्हणाले होते. ती देखील अजून मिळाली नाही.सत्तेसाठी मराठी माणसाला कधीच वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे मराठीचा ठेका या आपल्याला भ्रमातून बाहेर या.” केशव उपाध्ये यांनी ट्विट करत शिवसेनेवर हा निशाणा साधला आहे.

संजय राऊतांचं ट्विट काय?

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीमधील भाजपाच्या विजयानंतर आव्हान देताना संजय राऊत म्हणाले की, “बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणला. भाजपाचे महाराष्ट्रातील पुढारी म्हणतात, आमचा भगवा बेळगावर फडकला. मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपाने लगेच ही मागणी करावी. तरच तुमचा भगवा खरा!”

“इतका नालायकपणा कुणी केला नव्हता!”

बेळगाव पालिका निवडणुकीच्या निकालांविषयी बोलताना सोमवारी (६ सप्टेंबर) संजय राऊत यांनी भाजपावर टोकाची टीका केली होती. ते म्हणाले होते की, “बेळगावात मराठी माणसाच्या झालेल्या पराभवाबद्दल आज महाराष्ट्रात ज्यांना उकळ्या फुटत आहेत, जे आज पेढे वाटतायत, त्यांना एवढंच सांगतो की महाराष्ट्रात आजपर्यंतच्या इतिहासात इतकी नादानी, इतका नालायकपणा आणि मराठी माणसाच्या बाबतीत इतकी गद्दारी आत्तापर्यंत कुणी केली नव्हती. महाराष्ट्रात अनेकांना याचं दु:ख आहे की तिथे मराठी माणूस हरवला गेला. पण तुम्ही पेढे कसले वाटताय? लाज वाटत नाही का?”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Belgaum election results bjp reaction on sanjay raut challenge gst