भारत व पाकिस्तान या उभय देशात शांतता राहावी, शस्त्रस्पर्धा कमी व्हावी आणि दोन्ही देशांदरम्यान महासंघ स्थापन व्हावा या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी दिल्ली विद्यापीठातील पाच विद्यार्थ्यांनी ‘कन्याकुमारी ते इस्लामाबाद’ अशी सायकल मोहीम सुरू केली आहे. या विद्यार्थ्यांचे करवीर नगरीत स्वागत करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतीय उपखंडात भारत व पाकिस्तान या देशांचा महासंघ स्थापन करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. याकरिता त्यांनी युरोपचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता लाभल्यास त्याचा उभय देशांचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे. या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे. १ जून रोजी कन्याकुमारी येथून या मोहिमेला प्रारंभ झाला.
केरळ येथे विरोधी पक्षनेते व्ही.एस.अच्च्युतानंद यांनी भेट देऊन सदिच्छा दिल्या. या मोहिमेत प्रवीणकुमार सिंग, विकास नारायण हर्ष, देशपाल चौधरी, राधेश्याम व अॅड.सुधीर हे समाविष्ट झाले आहेत. मोहिमेदरम्यान दक्षिण भारतीय नागरिकांकडून चांगले सहकार्य लाभल्याचा उल्लेख त्यांनी केला. भोजन, चहापान याकरिता जास्त खर्च होत असला, तरी लोकांकडून मदत होत असल्याने अडचणी आल्या नाहीत, असे या मोहीमवीरांचे म्हणणे आहे.
मोहिमेदरम्यान वुई लव्ह अवर नेबर पाकिस्तान या संदेशावर लोकांची स्वाक्षरी घेतली जात आहे. आतापर्यंत ५ हजारावर नागरिकांनी त्यावर सह्य़ा केल्या आहेत. दररोज ७० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला जातो. ३१ जुलैला राजधानी नवी दिल्लीत मोहिमवीर पोहोचणार आहेत. तर स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला वाघा बॉर्डर येथे भारत व पाकिस्तानचा स्वातंत्रदिन एकत्रित साजरा करण्याचा त्यांचा मानस आहे. ३१ ऑगस्टला आम्ही इस्लामाबादला पोहोचू असा विश्वास प्रवीणकुमार सिंग यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2013 रोजी प्रकाशित
‘कन्याकुमारी ते इस्लामाबाद’ सायकल मोहीम
भारत व पाकिस्तान या उभय देशात शांतता राहावी, शस्त्रस्पर्धा कमी व्हावी आणि दोन्ही देशांदरम्यान महासंघ स्थापन व्हावा या उद्देशाने जनजागृती करण्यासाठी दिल्ली विद्यापीठातील पाच विद्यार्थ्यांनी ‘कन्याकुमारी ते इस्लामाबाद’ अशी सायकल मोहीम सुरू केली आहे.

First published on: 02-07-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bicycle march from kanyakumari to islamabad