राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी लोकसभेत एकाच वेळी प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात दोन्ही काँग्रेसची ताकद वरचेवर घटत चालली असून नवा राजकीय पर्याय म्हणून भाजपचे ‘कमळ’ फुलत चालले आहे. आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा विचार करता दोन्ही काँग्रेससमोर भाजपचे कडवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत.
गेल्या महिन्यात झालेल्या स्थानिक नगरपालिका निवडणुकांमध्ये नाही म्हटले तरी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पट्टय़ात मिळालेले यश भाजपचा उत्साह वाढविणारे ठरले असतानाच आता महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आणखी मोठय़ा ताकदीने उतरण्याची तयारी भाजपने चालविली आहे. अर्थात सत्ता नसल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये आलेली मरगळ, त्यातच गटबाजी व साटमारीचे राजकारण याचा पुरेपूर लाभ घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. किंबहुना विशेषत: महापालिकेत सत्ता मिळण्याची स्वप्न आतापासूनच भाजपला पडू लागले आहे. गटबाजीचा लाभ उठवत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे उरले सुरले वर्चस्व नष्ट करण्यासाठी पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या खांद्यावरच बंदूक ठेवून भाजप सावध राजकारण खेळत आहे. इतकेच नव्हे तर ऐनवेळी दोन्ही काँग्रेसमधील काही मोठे मासे हाती लागण्यासाठीही भाजपने हालचाली सुरू केल्याचे दिसून येते. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी समितीचे अध्यक्षपद स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आहे. शिवाय चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अन्य सहा मंत्रीही या समितीत आहेत. त्याचा राजकीय अर्थ, राष्ट्रवादींतर्गत राजकारणात सध्या अडगळीत पडलेले व अजित पवार यांच्यापासून चार हात दूरच असलेले ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना भाजपमध्ये ओढायचा प्रयत्न असू शकतो, असा काढला जात आहे.
ग्रामीण भागात ताकद कमी
अक्कलकोट व दक्षिण सोलापूरचा अपवाद वगळता जिल्हा ग्रामीण भागात भाजपची ताकद नगण्य आहे. तर सोलापूर शहरात भाजपची ताकद वाढलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात याच सोलापुरातून सर्वप्रथम १९९० साली लिंगराज वल्याळ यांच्या माध्यमातून भाजपचा पहिला आमदार झाला होता. त्यानंतर १९९६, २००३ (पोटनिवडणूक) व २००४ अशा तीन वेळा सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपला खासदारपद मिळाले होते. नंतर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लक्ष घालून भाजपला थोपवून धरले होते खरे; परंतु गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत स्वत: शिंदे यांनाच दारुण पराभव पत्करावा लागला. वीरशैव लिंगायत व पद्मशाली तेलुगु हे दोन्ही बहुसंख्येने असलेले समाज भाजपचे बलस्थान ठरले आहेत. यातच सामाजिक ध्रुवीकरणाची सुप्त प्रक्रिया चालतच राहिल्याने भाजपची मतपेटी मजबूत होत आहे.
सोलापूर महापालिकेत १९७८-८० आणि १९८५-८६ सालची अनुक्रमे तत्कालीन समाजवादी काँग्रेस आणि पुलोदचा अपवाद वगळता जवळपास गेल्या ५२ वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. त्यातही अलीकडे २५ वर्षांपासून सुशीलकुमार शिंदे यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी विष्णुपंत कोठे हेच कारभारी म्हणून महापालिकेत कारभार पाहत होते. कोठे हे शिंदे यांच्यापासून दुरावल्यानंतर आता स्वत: शिंदे यांनाच लक्ष घालावे लागत आहे. परंतु तरीही बदलल्या परिस्थितीत भाजपचे आव्हान दिवसेंदिवस कडवे होत चालले आहे.
एकाच वेळी पालकमंत्री विजय देशमुख व सुभाष देशमुख हे दोन्ही मंत्री लाभल्याने त्याचा पुरेपूर लाभ उठवत भाजपने सत्तेची गणिते घालायला सुरुवात केली आहे. त्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासह सोलापूर शहर व जिल्ह्य़ासह परिसरात तब्बल २७ हजार कोटी खर्चाच्या रस्ते विकास कामांचे गाजर दाखवत भाजपने श्रेय लाटत जनतेला भुरळ पाडायला सुरुवात केली आहे.
१०२ सदस्य संख्येच्या महापालिकेत सध्या भाजपची सदस्य संख्या २६ इतकी आहे. सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचेही डाव आखले जात आहेत. तर स्थानिक वातावरण पाहता स्वबळावर किमान ६० सदस्य निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या भाजपला अतिआत्मविश्वासाही ज्वर झाल्याचे दिसून येते. शिवसेनेबरोबर युती न करण्याचा पवित्रा भाजपने घेतल्यामुळे शिवसेनेची मंडळी अक्षरश: अस्वस्थ झाली आहेत. युती होण्यासाठी सेनेचे स्थानिक नेते भाजपचे दार सातत्याने ठोठावत आहेत. यात दबावतंत्राचा विचार करता त्यात भाजप अग्रेसर ठरला आहे.
देशमुखीतील बेबनाव..
- एकूणच, सोलापुरात भाजपची ताकद वाढत चालल्याचे दिसत असले तरी दुसरीकडे या पक्षात सर्व काही ठिकठाक आहे, असे म्हणता येणार नाही. विजय देशमुख व सुभाष देशमुख या दोन्ही मंत्र्यांवर भिस्त ठेवून असताना दोन्ही देशमुखांमधून विस्तवही जात नाही, अशी स्थिती आहे.
- त्यातून गट-तट वाढले आहेत. पक्षाच्या नगरसेवकांमध्येही सरळ सरळ गट उभे आहेत. अलीकडे पालकमंत्री विजय देशमुख यांनी पक्षांतर्गत बेरजेचे राजकारण करून घडी बसविण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु गटबाजी उघडपणे होत असून यातून भाजपचे थेट ‘काँग्रेसीकरण’ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काँग्रेसमध्ये सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते-पाटील हे दोन गट ज्याप्रमाणे होते, तद्वतच भाजपमध्ये दोन्ही देशमुखांच्या गटबाजीकडे पाहता येईल.
- ही गटबाजी मिटली नाही तर महापालिकेत सत्तेजवळ पोहोचूनही ऐनवेळी संधी गमावण्याची शक्यता भाजपच्याच वर्तुळात व्यक्त होत आहे. ‘अभी नही तो कभी नही.’ असे संघ परिवारात बोलले जात आहे.