अडवाणींच्या राजीनाम्यानंतर पक्षातील मतभेदांवर पांघरुण टाकण्यासाठी सक्रिय झालेल्या भाजप नेत्यांच्या मांदियाळीने संघ मुख्यालय ढवळून निघाले आहे. सलग दोन दिवसांत भाजपचे डॉ. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी हे दोन बडे नेते नागपुरात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भेटीसाठी आले. त्यांच्या पाठोपाठ शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह नागपुरात येत असून, सरसंघचालकांशी चर्चा करणार आहेत. सलग तीन दिवसांत तीन बडय़ा नेत्यांच्या हजेरीने नागपूर शहर पुन्हा एकवार राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू झाले आहे.
नरेंद्र मोदींची भाजपचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अडवाणींनी राजीनामा दिला होता. राजीनामा मागे घेण्यासाठी ‘आरएसएस’ कार्ड वापरण्यात आल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजप नेत्यांमधील अंतर्गत मतभेदांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी गुरुवारी डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्याशी मुख्यालयात बंदद्वार चर्चा केली.
सरसंघचालकांशी गुरुवारी दिवसभर चर्चा केल्यानंतर मुरली मनोहर जोशी रात्री नवी दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास अडवाणींचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. अडवाणींनीही विमानतळावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलणे टाळले आणि त्यांच्या गाडय़ांचा ताफा थेट संघ मुख्यालयात रवाना झाला. भाजपची निवडणूक रणनीती ठरविण्याच्या दृष्टीने अडवाणी आणि भागवत भेट महत्त्वाची समजली जात आहे. अडवाणी यांनी गुरुवारी भाजपच्या नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत हजेरी लावून नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले मतभेद संपल्याचे चित्र उभे केले आहे. या पाश्र्वभूमीवर नरेंद्र मोदीदेखील नागपुरात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परंतु, भाजपच्या सूत्रांनी याला दुजोरा दिलेला नाही. संघाच्या सूत्रांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी विदेशात आहे. त्यामुळे बडय़ा नेत्यांच्या नागपूर भेटीदरम्यान त्यांची गैरहजेरी प्रकर्षांने जाणवली.
अन्न सुरक्षा विधेयक बोगस -डॉ. जोशी  
मुरली मनोहर जोशी यांनी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना अन्न सुरक्षा विधेयक बोगस असल्याची टीका केली. मात्र, सरसंघचालकांशी झालेल्या चर्चेबाबत काहीही बोलणे टाळले. त्यांनी छत्तीसगड सरकारने याआधीच गरिबांसाठी अन्न सुरक्षेची प्रणाली राबविल्याचा दावा केला. शेतकरी, दारिद्रय़रेषेखालील जनता यांना धान्य वाटप करण्यासाठी सरकारजवळ कोणतेही धोरण नसल्याचे सांगून गरिबांना वाटण्यासाठी गोदामात पुरेसा धान्यसाठा आहे काय, असा सवाल त्यांनी केला.