युतीबाबत आपण आशावादी असून भाजपा आणि शिवसेना नैसर्गिक मित्र असल्याचं वक्तव्य भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आम्हाला अहंकार नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु असून यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांची नाराजी ऐकून घेतली असून दोघेही पक्ष सोडणार नाहीत असं सांगितलं आहे.

“पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची नाराजी ऐकून घेतली. दोघेही पक्ष सोडणार नाहीत. या सर्व मीडियाने तयार केलेल्या बातम्या आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपाचेच बाळकडू मिळालं आहे. त्यामुळे त्या पक्ष सोडणार नाहीत,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. तसंच उद्या गोपीनाथ गडावर मला निमंत्रण असून मी जात आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

आणखी वाचा- पंकजा मुंडेच्या पोस्टरवरून कमळ गायब! समर्थकांच्या मनात नेमकं काय?

पंकजा मुंडेंच्या पोस्टरवरून कमळ गायब!
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे उद्या (१२ डिसेंबर) कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. गोपीनाथ गडावर हा मेळावा होणार असून याच दिवशी परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे, पण महत्त्वाचे म्हणजे या मेळाव्याच्या पोस्टरवरून कमळ हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे.

गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याला अवघा एक दिवस उरला आहे. त्यामुळे संपूर्ण परळीत मेळाव्याचे पोस्टर लावणे सुरु झाले आहे. या मेळाव्याच्या पोस्टरवरून भाजपा आणि कमळ गायब असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपाचे नाव किंवा कमळाचे चिन्ह नाही. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेदेखील अद्याप लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडे खरंच वेगळा मार्ग निवडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.