उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘रोखठोक’ या सदरात भारतीय जनता पक्षाबाबत गंभीर दावे केले आहेत. या दाव्यांना आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. त्याशिवाय, सुधीर मुनगंटीवार यांनीही संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यातच गडकरींना पाडण्यासाठी फडणवीसांनी रसद पुरवली होती, या आरोपावर काँग्रेस नेके विकास ठाकूर यांनीही संताप व्यक्त केला आहे.

काय आहे संजय राऊतांच्या लेखात?

संजय राऊतांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. “गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात”, असं संजय राऊत यांनी लेखात म्हटलं आहे. तसेच, “आता भाजपाचं सरकार आलं तर अमित शाह योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील”, असा दावाही राऊतांनी केला आहे.

बावनकुळेंचं खोचक प्रत्युत्तर

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार?” असा सवाल बावनकुळेंनी केला आहे.

“संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडणार. २०१९ मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक ‘ रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या”, असं आव्हान बावनकुळेंनी संजय राऊतांना दिलं आहे.

संजय राऊतांना हे व्यसन – मुनगंटीवार

“संजय राऊतांना आधी खोटं बोलायची सवय होती. आता ते व्यसन झालंय. आमच्या पक्षात मीठ कालवता येईल का हा प्रयत्न ते करत आहेत”, अशा शब्दांत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे.

“…म्हणून देवेंद्र फडणवीस नाईलाजाने प्रचारात उतरले”, गडकरींचा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा; मोदी-शाहांना केलं लक्ष्य!

दरम्यान, फडणवीसांनी रसद पुरवल्याच्या दाव्यावर नागपूरपमधील गडकरींच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदावार विकास ठाकरे यांनी टीका केली आहे. “भाजपाशी त्यांचं काय दुखणं आहे ते त्यांनी निपटावं. पण महाविकास आघाडीचं बंधन त्यांनी पाळावं. नाहीतर राऊतांच्या विरोधात आम्ही खूप बोलू शकतो. एवढंच होतं तर त्यांनी गडकरींसोबत युती करून वेगळी महाविकासआघाडी करायची होती”, अशी प्रतिक्रिया विकास ठाकरे यांनी दिली आहे.