राज्यात शिंदे गट आणि भाजपाचं सरकार आल्यापासून ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. संजय राठोड यांच्या मंत्रीपदावरून ठाकरे गट आणि भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यंच्यामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आलं आहे. या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत झालेल्या वादाचीही राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रा वाघ विरुद्ध ठाकरे गट असा वाद रंगण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीवरून आक्षेप घेणाऱ्या या ट्वीटमध्ये चित्रा वाघ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून सध्या सुरू असलेल्या वादाचा उल्लेख केला आहे.

काय आहे वाद?

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या उल्लेखांवर भाजपाकडून तीव्र आक्षेप घेतला जात आहे. सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, त्यांच्या सांगण्यावरून सावरकरांनी काँग्रेसविरोधात काम केलं, असा दावा राहुल गांधींनी यात्रेदरम्यानच्या एका भाषणात केला आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यावरून ठाकरे गटाला लक्ष्य करताना चित्रा वाघ यांनी ट्वीटमधून आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला आहे.

“सावरकरांसोबत बाळासाहेब ठाकरेंनाही…”, संजय राऊतांचं एकनाथ शिंदे गटावर टीकास्र!

“कोणीतरी सांगितलेला इतिहास ऐकायचा आणि काहीही बोलायचं ही कुठली वैचारिक प्रगल्भता? म्हणे सावरकरांनी कोणा दुसऱ्याकडून स्वतःवर पुस्तक लिहून घेतलं. हा रागांचा (राहुल गांधी) बेसूर झालेला नवा राग का?” असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्वीटमधून उपस्थित केला आहे.

“आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतंय की…”

दरम्यान, राहुल गांधींवर खोचक टीका करताना चित्रा वाघ यांनी त्यांच्या भारत जोडो यात्रेत उपस्थिती लावणाऱ्या आदित्य ठाकरेंना आणि ठाकरे गटालाही लक्ष्य केलं आहे. “आश्चर्य तर या गोष्टीचंही वाटतं की सावरकरांचा सतत अपमान करणाऱ्यांसोबत मा.बाळासाहेबांचे वारसदार फिरतात तरी कसे ?? वारसदार हे कुटुंबात जन्म झाल्यानं होत नाही तर विचारांनी असतात, हेच खरं”, असंही चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्यांच्या जाज्वल्य देशभक्तीला पुजायला हवं, त्यांची याच महाराष्ट्रात अवहेलना करण्याची हिंमत कोणी करतंय..रक्त सळसळत नाही का?” असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग केलं आहे.