राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत शपथ घेण्याच्या निर्णयावरुन पश्चात्ताप व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

फडणवीसांनी सांगितलं की, “शिवसेनेने विश्वासघात केल्यानंतर जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन केलं होतं. कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला होता”.

पुढे बोलताना त्यांनी, “आम्ही जशास तसं उत्तर देण्याचा विचार केला याचा मला पश्चात्ताप आहे. हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असंही सारखं वाटतं. मला माहिती आहे त्यावेळी काय झालं होतं आणि कोणी काय केलं होतं” असं सांगितलं. फडणवीसांनी आपण एक पुस्तक लिहिणार असून त्यामध्ये या सर्व घटना उघड करणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी राज्यात फक्त सरकार असून प्रशासन नसल्याची टीका केली.

महाराष्ट्र सरकारने करोना मृत्यूची आकडेवारी लपवली

महाराष्ट्रात करोना स्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात आली नसल्याची टीका यावेळी फडणवीसांनी केली. ते म्हणाले की, “राज्य सरकारने १० हजार मृत्यू लपवले. सरकारने करोना स्थिती योग्य प्रकारे हाताळल्याचं सांगत आपली पाठ थोटपली, मात्र देशातील एकूण मृत्यूंपैकी ३५ टक्के मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाल्याचं सत्य ते स्वीकार का करत नाहीत?”.

राज्य सरकार कोसळणार असल्याच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले की, “सरकार जेवढं स्थिर दिसतं, तितकंच ते कोसळण्याची शक्यता अधिक असते”. यावेळी त्यांनी हे सरकार आपल्याच वजनाने खाली येईल असा पुनरुच्चार केला.