हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरु असून यावेळी विरोधकांनी मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं असून ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी केला तर आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा दिला आहे. “ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी होणार नाही हे सरकारने आपल्या मंत्र्यांना सांगितलं पाहिजे. पण जर कोणी वाटेकरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरु, आम्ही मान्य करणार नाही,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

“आमच्या काळात मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात कोणती स्थगिती आली नाही. पण आता घटनापीठाकडे जात असताना स्थगिती आली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्या मराठा तरुणांवर सरकारमुळे घरी बसण्याची वेळ आली आहे. सरकारनेच कोर्टात आम्ही भरती करणार नसल्याचं सांगितलं. आ बैल मुझे बार प्रकारे कोर्टाने विचारलेलं नसतानाही राज्य सरकारने सांगून टाकलं. यामुळेच प्रक्रिया पूर्ण झालेले मराठा तरुण आज बसलेले आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नाही,” असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- कंत्राटी शेतीचा कायदा सगळ्यात आधी महाराष्ट्राने केला, सरकारचा विरोध बेगडी- फडणवीस

“आमच्या काळात मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन, मोर्चे झाले..पण कधी कोणाला अटक नाही झाली. कोणाला मोर्चा काढू नका, मुंबईत येऊ नका असं झालं नाही. आज तर एका प्रकारे आणीबाणी लागली आहे. मराठा समन्वयकांना अटक होते, मुंबईत येऊ नका असे आदेश काढले आहेत. ते आपले नागरिक आहेत, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. पण आंदोलन करायचंच नाही या भूमिकेमुळे संताप निर्माण होतोय,” अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.

“एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय असताना दुसरीकडे ओबीसी समाजासंदर्भातही संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारमधील मंत्री मोर्चे कसे काढू शकतात? त्यांनी शपथ घेतली आहे. मोर्चा काढायचा असेल तर राजीनामा दिला पाहिजे. सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढत असल्याचं पहिल्यांदा पाहतोय. हेच सरकारविरोधात मेळावे घेत आहे. ओबीसी आरक्षणात कोणालाही वाटेकरी करणार नाही हे सरकारने स्पष्ट सांगण्याची गरज आहे. मंत्र्यांनी हे मंत्रीमंडळात सांगायची गरज आहे आणि तसा ठराव घ्या. आम्ही मराठा आरक्षण करताना तशी तरतूद केली असून ओबीसीला संरक्षण दिलं आहे. सरकारी पक्षाच्या लोकांनीच दोन्ही भूमिका घेत तेढ निर्माण करणार असतील तर कायदा सुव्यवस्था कशी टीकेल?,” अशी विचारणा फडणवीसांनी केली आहे.

आणखी वाचा- बसवरचा भगवा काढल्याने चंद्रकांत पाटील संतापले; ठाकरे आणि शरद पवारांवर साधला निशाणा

“धनगर समाजासंदर्भात आम्ही केलेल्या सर्व योजना बंद आहेत. सरकारच्या मनात नेमकं काय आहे हे आम्हाला समजत नाही. यामुळे वेगवेगळ्या घटकांच्या मनात सरकार संदिग्धता निर्माण करत असून ते दूर झालं पाहिजे,” असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं. विजय वडेट्टीवार ज्या खात्याचे मंत्री आहेत ते खातंच मी निर्माण केलं आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

फडणवीसांनी यावेळी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवरील पुस्तकावरुन ठाकरे सरकारला टोला लगावला. “महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही असं पुस्तकाचं नाव आहे. तो थांबूच नये. महाराष्ट्राला कोणी थांबवू शकत नाही. थांबवण्याची कोणाची ताकद नाही. पण पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं की घोषणा थांबणार नाहीत आणि अमलबजावणी होणार नाही,” असं ते म्हणाले.

आणखी वाचा- “महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय शिवराय’चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे?”

वीज बिलाच्या सवलतीवरुन काय झालं अशी विचारणा फडणवीसांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीत विसंवाद नाही असं सांगतात पण वीज बिलावरुन काय संवाद आहे अशी विचारणा त्यांनी केली. जी वीज वापरलीच नाही त्याचं बिल कसं भऱणार? अशी विचारणा फडणवीसांनी यावेळी केली. महाविकास आघाडीत संवाद निर्णयात दिसू द्या असं सांगताना सरकारने वीज बिलासंबंधी घोषणा करुन फसवणूक केली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.