त्रिपुरातील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चांनंतर राज्यात हिंसक घटना घडल्या. त्रिपुरा येथील घटनेचा नागरीकांनी एकत्र येऊन १११ ठिकाणी निषेध केला होता. विविध सरकारी अधिकारी, कार्यालयांना निवेदने देण्यात आली होती. मात्र, या मोर्चांना हिंसक वळण लागले होते. त्यानंतर अमरावतीमध्ये भाजपाने पुकारलेल्या बंददरम्यान समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलिसांसह नऊ जखमी झाले. शहरातील काही धार्मिक स्थळांसमोर नासधूस करण्यात आल्याने वातावरण चिघळले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला होता.

रविवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये हिंसक वळण लागलेल्या भागांना भेट देऊन तिथल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले याची पहिल्यांदा चौकशी व्हायला हवी. त्यांची याच्या पाठीमागची भूमिका काय होती. दंगल होण्यासाठी हे आयोजन केले होते का या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

“रझा अकादमी ही काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते? यापूर्वीही मुंबईमध्ये अशा प्रकारची दंगल आणि पोलिसांना मारण्याचे काम रझा अकादमीच्या मोर्चामध्येच का झाले होते. तेव्हाही काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे ही कोणाची बी टीम आहे हे सगळ्यांना माहिती आहे. रझा अकादमीवाल्यांसोबत कोणाचे फोटो आहेत हे देखील तपासले पाहिजे. आशिष शेलारांचे फोटो तुम्ही दाखवले पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दाखवले का? काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांचा दाखवला का? त्यामुळे समजा त्यांचे मत आहे की रझा अकादमी भाजपाची बी टीम आहे तर मग मी आज मागणी करतो त्यांच्यावर बंदी घाला. काँग्रेसमध्ये हिम्मत नाही. कारण ते कोणाचे पिल्लू आहे हे सगळ्यांना माहिती आहे,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

“अमरावतीमध्ये जो काही घटनाक्रम झाला तो अतिशय दुर्दैवी आहे. १२ नोव्हेंबरला जो मोर्चा निघाला तो चुकीच्या माहितीच्या आधारे जाणीवपूर्वक राज्यभरामध्ये कारस्थान करुन निघाला होता. त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत त्यांची खोटी माहिती सोशल मीडियावर पसरवण्यात आल्या. याद्वारे देशभरामध्ये समाजाला भडकवण्यात आले. इतके मोठे मोर्चे एकाच दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये निघतात हे नियोजीत मोर्चे होते. खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले याची पहिल्यांदा चौकशी व्हायला हवी. त्यांची याच्यापाठीमागची भूमिका काय होती. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अराजकता तयार करायची होती का? दंगल होण्यासाठी हे आयोजन केले होते का या सर्वांची चौकशी व्हायला पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

“१२ नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये मोर्चा निघाला. या मोर्चाला काय विचार करुन परवानगी देण्यात आली याचीही चौकशी झाली पाहिजे. या मोर्चाच्या नंतर समाजकंटकांनी ज्याप्रकारे दुकाने आणि लोकांना लक्ष्य केले. यातून दंगल घडवायची होती म्हणून एका विशिष्ट समाजाच्या आणि धर्माच्या दुकानांवर हल्ला करण्यात आला. त्यातून अमरावतीची परिस्थिती बिघडली,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.