केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न देऊन भाजपाने उदयनराजेंचा अवमान केला – शशिकांत शिंदे

उदयनराजेंचा केवळ राजकीय वापर करून घेतला, त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही, असं देखील म्हणाले आहेत.

BJP insulted Udayan Raje, MLA Shashikant Shindes allegation
उदयनराजे भोसले हे आज राष्ट्रवादीत असते, तर त्यांच्या शब्दाला महाविकासआघाडी सरकारमध्ये वजन असते, असं देखीकल आमदार शिंदे यांनी सांगितलं आहे. (संग्रहीत छायाचित्र)

“उदयनराजे भोसले यांना मुदतपूर्व राजीनामा देण्यास सांगून भाजपाने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द दिला होता. मात्र संधी न देऊन एकप्रकारे उदयनराजेंच अवमान केला आहे. भाजपाने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही.” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

“ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून काही ठराविक विचारसरणीचे लोक महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम कोण करत आहे, हे सामान्य जनतेला चांगले माहीत आहे. भारतीय जनता पक्षाने शब्द दिला होता, मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी न देऊन खासदार उदयनराजे भोसले यांचा एकप्रकारे अवमानच केला आहे.” असा आमदार शशिकांत शिंदे यांनी आरोप केला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि भाजपाची भूमिका याविषयी बोलतान आमदार शिंदे म्हणाले की, “ शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम आहे. ते आमच्या पक्षाचे खासदार होते. त्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्षे एकत्रितपणे काम केले त्यांच्या कामाची पद्धत आम्हाला चांगली माहीत आहे. भाजपाने शब्द दिल्याने त्यांनी मुदतीपूर्व राजीनामा दिला. भाजपाने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द देऊनही संधी दिली नसल्याची चर्चा साताऱ्यात आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये खासदार उदयनराजे भोसले व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना संधी न देऊन पश्‍चिम महाराष्ट्रावर भाजपाने अन्याय केला आहे. या दोघांपैकी एकाला संधी मिळाली असती तर पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी ते चांगले झाले असते. पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपाची विशेष अशी ताकद नाही. राष्ट्रवादी-काँग्रेससह अन्य मित्रपक्षांचे नेते स्वत:कडे खेचून भाजपाने आपली ताकद असल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.”

तसेच, “ खासदार उदयनराजे भोसले हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असते, तर त्यांच्या शब्दाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वजन असते. राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी निश्‍चितपणे विकासकामे केली असती. मात्र, भाजपाने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही याचे दु:ख वाटते.” असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp insulted udayanraje by not giving him a place in the union cabinet shashikant shinde msr