शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. एकनाथ शिंदे आपल्यासह ४० हून अधिक आमदार घेऊन चार्टर्ड विमानाने आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. या बंडखोरीमागे भारतीय जनता पार्टीचा सहभाग असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी केला आहे. यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट नावच घेतलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, “हे बघा, हे सगळं जे कारस्थान आहे, त्याचा सूत्रधार कोण आहे, हे तुम्हाला माहीत आहे. दर दिवसाआड देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातात, अमित शाहांना भेटतात, नड्डांना भेटतात, आणखी कुणाला भेटतात…पुढची रणनीती आखतात. ईडीचं काय करायचं? कुणावर कसा दबाव टाकायचा? त्यानंतर साधनसामग्रीची व्यवस्था करतात. दर दोन दिवसाला हे सुरू आहे. त्यामुळे याचा सूत्रधार कोण आहे? याचा कर्ता करवीता कोण आहे? हे आता स्पष्ट झालं आहे. याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा बैठका झाल्या असतील, उद्या परवा पुन्हा बैठका होतील,” असंही ते म्हणाले

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील राजकीय स्थिती जैसे थे ठेवायला सांगितली आहे. याचा अर्थ कुणीच काही करू नका, ११ जूनला सुनावणीच्या दिवशी त्याच प्रकारची परिस्थिती असायला हवी,” असं न्यायालयाने सांगितलं आहे. असं असताना विधान सभेत अविश्वास ठराव आणला जाईल, अशी चर्चा सुरू आहे. पण यामध्ये अनेक घटनात्मक पेच असल्याचंही त्यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैधानिकदृष्ट्या शिवसेना पक्षात अद्याप फूट पडली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू असून रिसोर्ट पॉलिटिक्स सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार आहेत का? याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, बंडखोरी झाल्यानंतर सुरुवातीला फेसबूक लाइव्हमध्ये मुख्यमंत्र्यांनी ‘मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे’ असं म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरल्या असाव्यात. पण आम्ही शेवटपर्यंत लढायचा निर्णय घेतला आहे, असंही ते म्हणाले.