राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ( २ मे ) मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राजकीय स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही यावर भाष्य केलं आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
“१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हापासून गेली २४ वर्षे राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहतोय. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरू झालेला, हा प्रवास गेली ६३ वर्षे अविरत सुरू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य म्हणून सातत्याने काम करत आहे. संसदेतील राज्यसभा सदस्यपदाची पुढील ३ वर्ष शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक लक्ष घालणाऱ्यावर माझा भर असेल,” असं शरद पवारांनी नमूद केलं.
हेही वाचा :
“सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबवण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.
“आपण राजकारणातही हवेत अन्…”
निवृत्तीच्या निर्णयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारचं अध्यक्ष असावेत, असं मत व्यक्त केलं आहे. ट्वीट करत नारायण राणे म्हणाले की, “शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुद्धा हवेत,” असं नारायण राणेंनी म्हटलं.
हेही वाचा : “गेली ६० वर्षे…”, शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यावर जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर; म्हणाले…
“शरद पवार आत्ता निवृत्त होत आहेत, याचा अर्थ…”
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शरद पवारांच्या निर्णयावर भाष्य केलंय. “शरद पवारांना भविष्यात काय होईल, हे लवकर लक्षात येतं. त्यामुळे शरद पवार आत्ता निवृत्त होत आहेत, याचा अर्थ २०२४ साली महाविकास आघाडीचं सरकार येऊच शकत नाही, हा अर्थबोध त्यांनी घेतला असावा. योग्यक्षणी निवृत्त झालो, तर २०२४ साली होणाऱ्या पराभवाचं अपश्रेय आपल्या वाट्याला येऊ नये, असं त्यांना वाटतं,” असेही सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं.