झाकीर नाईकने साडेचार कोटींची देणगी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला दिली होती असा आरोप आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यानंतर याविषयीचं स्पष्टीकरण भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे. झाकीर नाईकने अडीच ते तीन कोटींची देणगी दिली होती असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असंही ते म्हणाले आहेत.

संजय राऊत यांचा आरोप काय?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडीकडून मुंबईत सुरु असलेल्या कारवाईवरुन सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला भारतातील वादग्रस्त धर्मगुरु आणि देशद्रोहाचा आरोप असलेला झाकीर नाईक याने साडेचार कोटी रुपये दिले असा आरोप केला.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय म्हटलं आहे?

“झाकीर नाईकने संस्थेला अडीच कोटी ते तीन कोटी रुपये दिले होते. अशी कबुली विखे पाटील यांनी दिली. पण झाकीर नाईकने हे पैसे ते १०-१५ वर्षांपूर्वी दिले होते. या प्रकरणी चौकशीही झाली होती.” असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे

“संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तुम्ही पत्रकार बांधवांनीही त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. झाकीर नाईकने १० ते १५ वर्षांपूर्वी प्रवरा मेडिकल ट्रस्टला अडीच ते तीन कोटी रुपये दिले होते. हे पैसे त्याने देणगी म्हणून दिले होते. ही रक्कम ४०० कोटी नव्हती. या प्रकरणी भारत सरकारने चौकशी करुन ती केस १० वर्षांपूर्वी बंद केली.” असं आता विखे पाटील यांनी म्हटलं आहे. आता संजय राऊत याबाबत काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.