संजीव कुळकर्णी, लोकसत्ता

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघात १९९६च्या निवडणुकीपासून काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत झाली. यंदा अशोक चव्हाण अधिक भाजपा विरुद्ध काँग्रेस आघाडी असे स्वरूप प्राप्त झाले.

yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
huge land acquisition in Koyna valley
कोयना खोऱ्यात प्रचंड जमीनखरेदी; अधिकाऱ्यांसह तिघे दोषी, सातारा जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचा अहवाल
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Varsha Gaikwad
“मतदानानंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला अन्…”; वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

१९८० पासूनच्या निवडणुकांचा मागोवा घेतल्यास या मतदारसंघाला आधी शंकरराव चव्हाण आणि त्यांच्या पश्चात अशोक चव्हाण आणि भास्करराव खतगावकर या प्रभावशाली नेत्यांनी ‘काँग्रेसचा बालेकिल्ला’ अशी ओळख दिली; पण यंदाच्या निवडणुकीआधी हे दोन नेते आपल्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये गेले, त्यांनी या पक्षासाठी आपली संपूर्ण राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत प्रचार केला तरी मतदान झाल्यानंतर गेल्या चार आठवड्यांत जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून जी चर्चा बाहेर येत आहे; जे अंदाज वर्तविले जात आहेत, ते चव्हाण-खतगावकर आणि भाजप या साऱ्यांची घालमेल वाढविणारे आहेत.

या मतदारसंघात नोंद घेण्याजोगी एक ठळक बाबही आहे. १९६२ पासूनच्या कोणत्याही दोन सलग निवडणुकांत काँग्रेस पक्ष पराभूत झाला नाही. २०१९ साली या पक्षाचा अनपेक्षित पराभव झाला.

भाजपाने खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. अशोक चव्हाण यांना तर मुक्तपणे फिरताही आले नाही आणि ठामपणे काही सांगता आले नाही. भाजपात का गेलो, हेच त्यांनी सर्वत्र सांगितले, तरी शंकररावांची सर्वसमावेशक भूमिका सोडून ते भाजपात गेल्याची बाब समर्थनीय किंवा त्यांना बळ देणारी ठरली नाही.

मराठा आरक्षणाच्या विषयात भाजप आणि शिंदे सरकारकडून झालेल्या निराशेची तीव्रता नांदेडमध्ये ठळकपणे बघायला मिळाली. या पार्श्वभूमीवर मराठा समाज काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचे दिसले. या पक्षाचे उमेदवार वसंत चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाचा या समाजात असलेला प्रभाव तसेच जिल्हाभरातील त्यांची नातीगोती-सगेसोयरे याचा लाभ काँग्रेसला झाला, असे मानले जात आहे.

मराठवाड्यातील इतर काही मतदारसंघांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी किंवा हिंदू-मुस्लीम असे ध्रुवीकरण बघायला मिळाले.

लिंगायत मतपेढीभोवतीची निवडणूक

प्रदीप नणंदकर, लोकसत्ता

लातूर : लातूरमध्ये गावोगावी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार की भाजपचा उमेदवार निवडून येणार, यावर पैजांना ऊत आला आहे . पण आरक्षित मतदारसंघात या वेळी लिंगायत मतपेढीच निर्णायक ठरेल, अशी चिन्हे आहेत. २०१४ व २०१९ या दोन लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव केल्यामुळे भाजपला याही वेळी विजय सोपा वाटतो आहे, तर काँग्रेसच्या मंडळींना उमेदवाराची निवड, केंद्र सरकारबद्दलची शेतकऱ्यांबद्दलची नाराजी, विविध समाजघटकांतील असंतोष या सर्वांचा आपल्याला लाभ होईल व एक लाखाच्या मताधिक्याने काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असे वाटते आहे.

या निवडणुकीत काँग्रेसने लिंगायत समाजातील माला जंगम समाजाचे डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली. जंगम समाज हा लिंगायत समाजाचा गुरू मानला जातो. त्यामुळेच गुरूला निवडून आणण्यासाठी सर्व लोक कामाला लागले आहेत. भाजपच्या विरोधात मुस्लीम समाज एकवटलेला आहे, त्यामुळे त्यांची एकगठ्ठा मते मिळतील शिवाय मराठा आरक्षण आंदोलनातून मराठा समाजात भाजपबद्दल तीव्र नाराजी आहे त्याचा लाभ मिळेल. शेतमालाचे पडते भाव या कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे, त्याचाही लाभ मिळेल व काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे हे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील, असे काँग्रेस समर्थकांना वाटते.

मराठा समाज व लिंगायत समाज काँग्रेसच्या बाजूने किती झुकतो त्यावर या निवडणुकीचे विजयाचे गणित अवलंबून आहे. भाजप ओबीसीच्या मतांवर विसंबून आहे. शिवाय सुधाकर शृंगारे बौद्ध समाजाचे असल्याने बौद्ध समाजाची मते भाजपला मोठ्या प्रमाणावर मिळतील. वंचितच्या उमेदवारांकडे हा समाज वळणार नाही. याशिवाय परंपरागत भाजपची मते व मोदी फॅक्टर यामुळे भाजपचा उमेदवार ५० ते ६० हजार मतांनी विजय होईल, असे भाजप समर्थकांना वाटते.

वाढलेल्या मतदानावर निकालाचे गणित

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : कोल्हापुरात वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला याची मतदानानंतर कमालीची चर्चा आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे संजय मंडलिक यांचा दुसऱ्यांदा संसदेत जाण्याचा मार्ग सुकर होणार की शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपाने खासदारकीचा मान गादीला मिळणार, यावरून सध्या पैजा लागल्या आहेत.

प्रचाराच्या धामधुमीच्या संघर्षाला आणखी धार चढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने मंडलिक यांच्यासाठी वातावरण निर्मिती झाली. हिंदुत्वाला अपेक्षित मतदान खेचण्यात ही सभा उल्लेखनीय ठरली. खेरीज, महायुतीच्या नेत्यांनी घेतलेली मेहनत मंडलिक यांचा दिल्ली दरवाजा उघडण्यापर्यंत जाणार का, याचे कुतूहल आहे.

दुसरीकडे आघाडीची उमेदवारी छत्रपती घराण्याला मिळाल्याने ही लढत वलयांकित झाली. साहजिकच विरोधकांकडून गादी – वारस असे मुद्दे उपस्थित झाले. मान गादीला – मत मोदीला अशी पद्धतशीर मांडणी महायुतीकडून केली गेली. तर विरोधकांकडून राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या लोकोपयोगी कामाची चर्चा घडवली. यातून आरोप प्रत्यारोपाची राळ उठली. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर येथे काँग्रेसचे आमदार आहेत. तर कागल, भुदरगड, चंदगड येथे महायुतीचे आमदार असल्याने येथील मतदान कसे होते, यावरही निकाल अवलंबून आहे. २००९ मध्ये दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात लढत होऊन मंडलिक विजयी झाले होते. यंदा पंधरा वर्षांनंतर पुन्हा या मतदारसंघातील लढत मंडलिक – छत्रपती घराण्यात रंगली आहे. यामुळे यंदा हा कौल कुणाला, याविषयी औत्सुक्य तयार झाले आहे.

प्रवाहाविरोधात कल देण्याची परंपरा

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात थेट लढतीचा तिसरा अंक रायगड लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला. यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकांप्रमाणे यंदाही दोघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळेल असा कयास वर्तवला जात आहे.

२०१९च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का किंचित घसरला आहे. मतदारसंघात ६०.५१ टक्के मतदानाची नोंद झाली. मुस्लीम मतांचे झालेले ध्रुवीकरण, शेकापचे पाठबळ आणि बहुजन समाजात संविधान बदलाबाबत असलेला असंतोष अनंत गिते यांच्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे.

तर मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व आहे. त्यामुळे महायुतीचे सुनील तटकरे सहज निवडून येतील, असा विश्वास महायुतीचे घटक पक्ष व्यक्त करत आहेत. गितेंची मतदारसंघातील निष्क्रियता त्यांच्यासाठी अडचणीची ठरेल असा विश्वास महायुतीला वाटतो आहे.

यापूर्वी झालेल्या निवडणुकीत मतदारसंघात जातीय आणि धार्मिक मतांचे ध्रुवीकरण झाल्याचे कधीच दिसून आले नव्हते. मात्र यावेळी मुस्लीम- बहुजन मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न झाले. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली होती. मतदारसंघात कुणबी समाज बहुसंख्य आहे. या समाजाची मते आपल्या पदरात पडावीत यासाठी गिते आणि तटकरे यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. यंदा कोणाच्या पारड्यात ती मते पडली यावरही निकालाची गणिते अवलंबून असणार आहेत.

या मतदारसंघात कुठल्याच लाटेचा प्रभाव कधी दिसून येत नाही. त्यामुळे प्रवाहाविरोधात जाणारा मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाट इथे निष्प्रभ ठरली होती. प्रवाहाविरोधात मतदान करण्याची पंरपरा रायगडकरांनी राखली का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.