निवडणुकांदरम्यान एकमेकांवर हल्लाबोल करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सोशल मीडियाचा पूरेपूर वापर करून घेत असतात. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये असेल किंवा २०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असतील त्यादरम्यान सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करून घेण्यात आला होता. मतदारांच्या जवळ पोहोचण्याचं उत्तम साधन म्हणून याकडे राजकीय पक्ष पाहू लागले आहेत. त्यातच भाजपाने साकारलेला ‘रम्या’ सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल करत आहे. यावेळी रम्याचे डोस या मालिकेतून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बिघडलं असून ते आता भंगारातच जाणार असल्याची टीका भाजपाने रम्याचे डोसच्या माध्यमातून केली आहे.
शुक्रवारी अजित पवार यांनी तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर बराच काळ ते कोणाच्याही संपर्कातही नव्हते. तसंच त्यांनी आपल्या राजीनाम्याची कल्पना कोणालाही दिली नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनादेखील त्यांच्या राजीनाम्याबद्दल कल्पना नव्हती. परंतु त्यानंतर शरद पवार सांगितील तो अंतिम निर्णय असंही त्यांनी म्हटलं होतं. आता भाजपाने रम्याचे डोस या मालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
घड्याळाचा मिनिट काटा आणि तास काटा विरुद्ध दिशेने फिरायला लागले.
रम्या म्हणतो हे घड्याळ भंगारातच जाणार!#रम्याचेडोस@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@NCPspeaks pic.twitter.com/uGX5C9cPRv— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 29, 2019
ईव्हीएम, कलम ३७० असो किंवा भगवा झेंडा.. दोघांची मत परस्पर विरूद्ध. दादांनी राजीनामा सुद्धा काकांना न विचारता दिला आणि त्यांना भेटल्यावर दादा म्हणतायत “काका सांगतील तो अंतिम निर्णय” असं एक व्यक्ती रम्याशी संभाषण करताना दाखवण्यात आली आहे. त्यावर रम्याही त्यांना उत्तर देतो. अरे हे घड्याळ ना… एक फटका दिला की थोडावेळ बरोबर चालतंय. पण नंतर मिनिट काटा आणि तास काटा विरूद्ध दिशेने फिरायला लागतात. हे आता काही दुरूस्त होणार नाही… भंगारातचं जाणार, असं रम्या त्या व्यक्तीला सांगताना दाखवण्यात आलं आहे.