विधान परिषदेतील अधिकृत आकडा वाढविण्यावर भर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लहानलहान पक्षांना बरोबर घेऊन काही समाजघटकांची मते आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने विधानसभा आणि विधान परिषदेतील आपला अधिकृत सदस्यांचा आकडा वाढविण्यावर भर ठेवला आहे. त्याचाच एक म्हणून  युतीतील काही उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणुका लढविण्यास भाग पाडले, तर मित्र पक्षाच्या तीन नेत्यांना भाजपची अधिकृत उमेदवारी देऊन विधान परिषदेवर निवडून दिले. राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली असली, तरी विधिमंडळात त्यांच्या पक्षाचे अस्तित्व उमटले नसल्याने भविष्यात ते भाजपचे उमेदवार असणार की अपक्ष, याची चर्चा सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या विरोधात महायुती करून निवडणुका लढविल्या. त्या वेळी शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष हे पाच पक्ष भाजपसोबत होते. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती तुटली. मात्र इतर लहान पक्ष भाजपसोबत रहिले. भाजपने मित्रपक्षांना काही जागा दिल्या, परंतु कमळ चिन्हावर निवडणुका लढवाव्यात, असा त्यांचा आग्रह होता. त्याला काही पक्षांनी मान्यता दिली. काहींनी अपक्ष म्हणून निवडणुका लढविणे पसंत केले. शिवसंग्रामच्या डॉ. भारती लव्हेकर या कमळ चिन्हावर भाजपच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. भाजपने पाठिंबा दिलेला राष्ट्रीय समाज पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला.

भाजपने मित्रपक्षांना मंत्रिपदे आणि विधान परिषदेची आमदारकी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राष्ट्रीय समाज पक्षाचे महदावे जानकर यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आणि सदाभाऊ खोत यांची राज्यमंत्रिपदावर वर्णी लावण्यात आली. भाजपने जानकर, खोत आणि विनायक मेटे यांना विधान परिषदेवर निवडून दिले. मात्र या तीनही नेत्यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्यांचे बाहेर वेगळे पक्ष असले तरी, विधान परिषदेत मेटे, जानकर व खोत हे भाजपचेच अधिकृत सदस्य आहेत.

विधान परिषदेत सध्या भाजप अल्पमतात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-२३, काँग्रेस-१९, भाजप-१७, शिवसेना-९, शेतकरी कामगार पक्ष-१, लोकभारती-१, पीपल्स रिपब्लिकन पक्ष-१ आणि अपक्ष -६ असे विधान परिषदेतील पक्षीय बलाबल आहे.