राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि भाजपा यांच्यामधील कलगीतुरा अद्याप संपण्याचं नाव घेत नाहीये. भाजपाकडून याआधी अनेकदा महाविकास आघाडीचं सरकार पडण्याविषयी विधानं केली जात होती. आता नवी मुंबईतील भाजपा आमदार गणेश नाईक यांनी तर थेट देवेंद्र फडणवीस नेमके कधी मुख्यमंत्री होणार? याचाच मुहूर्त जाहीर करून टाकला आहे. विशेष म्हणजे, भर कार्यक्रमात व्यासपीठा वरूनच फडणवीसांच्या उपस्थितीत पालिका अधिकाऱ्यांना तंबी देखील देऊन टाकली आहे!

“महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंग फडणवीसांनीच केलं!”

नवी मुंबईत झालेल्या पालिकेच्या एका कार्यक्रमात गणेश नाईक, देवेंद्र फडणवीस आणि मंदा म्हात्रे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी फडणवीसांवर स्तुतिसुमनं उधळली. “महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंग खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल, तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलं. अजिबात राजकारण आणलं नाही”, असं गणेश नाईक म्हणाले.

“…तेव्हा कुणाला फोन करायची गरज नाही”

दरम्यान, २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवतील, असं गणेश नाईक यावेळी म्हणाले. “मी सांगणार नाही की तुम्ही २ महिन्यांत मुख्यमंत्री व्हाल. पण २०२४ साली नक्कीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. एकहाती सत्ता येईल. तेव्हा कुणाला फोन वगैरे करण्याची गरज भासणार नाही”, असं गणेश नाईक म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पालिका अधिकाऱ्यांना इशारा!

यावेळी बोलताना गणेश नाईक यांनी व्यासपीठावरून पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच इशारा दिला. “महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माझा संदेश आहे. आज होणारा अंधार हा कायम अंधार राहात नाही. तो कधी ना कधी उजेड होतो. तुम्ही कायद्याच्या चौकटीत अयोग्य असेल, त्या गोष्टी अयोग्य समजा. पण कुणाच्या दबावाखाली तुम्ही ते करत असाल, तर दिवस बदलणार आहेत. आम्ही सूड घेणार या भावनेने मी बोलत नाही. पण ज्या ज्या लोकांनी गरीबांचा छळ केला, त्या लोकांना त्याचे जाब द्यावे लागतील हा गणेश नाईकचा शब्द आहे”, असं नाईक यावेळी म्हणाले.