scorecardresearch

Nitesh Rane Case Hearing: नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम, जामीन अर्ज फेटाळला; कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

Nitesh Rane Case Hearing Updates: नितेश राणेंची हायकोर्टात धाव; उद्या होणार सुनावणी

Nitesh Rane Case Hearing Updates: शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता. त्यानुसार आज कोर्टाने निर्णय दिला असून जामीन नाकारला आहे. मात्र यावेळी कोर्टाबाहेर नितेश राणेंची गाडी अडवण्यावरुन निलेश राणे आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली होती. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर संतोष परब यांच्यासाठी अ‍ॅड प्रदीप घरत तर आमदार राणे यांच्यासाठी अ‍ॅड सतीश मानशिंदे यांनी सोमवारी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाकडून निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आज सुनावणीदरम्यान कोर्टाने जामीन नाकारला असून यानंतर नितेश राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे.

आता हायकोर्टात काय निकाल लागतो हे पहावं लागणार आहे.

Live Updates

Nitesh Rane Case Hearing Updates: सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार नितेश राणे जिल्हा न्यायालयात शरण गेले

16:27 (IST) 1 Feb 2022
त्यांना आधी शरण जावं लागेल – अनिल परब

“कोर्टात शरणागतीचा कोणताही अर्ज केलेला नाही. जोपर्यंत शरण येत नाही तोपर्यंत जामीन तोपर्यंत जामीन अर्जासाठी पात्र होत नाही. जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत जामीन होत नाही. म्हणून कोर्टाने अर्ज फेटाळला असून ते आता हायकोर्टात जातील. पण त्यांना आधी शरण जावं लागेल,” असं अनिल परब म्हणाले आहेत.

16:18 (IST) 1 Feb 2022
असं रक्तरंजित राजकारण कोकणात कधीच नव्हतं – दीपक केसरकर

एखाद्याला मारण्यासाठी माणसं पाठवणं राजकारण नाही. राजकारणासाठी ते गुन्हेगारीचा वापर करतात. जी व्यवस्था आहे तिचा वापर करणं चुकीचं आहे. असं रक्तरंजित राजकारण कोकणात कधीच नव्हतं. त्याची सुरुवात यांनी केली आहे. त्यामुळे चांगल्या पद्दतीने तपास करण्यात आला असं मला वाटतं असंही केसरकर म्हणाले.

16:16 (IST) 1 Feb 2022
पोलिसांकडे आत्मसमर्पण करणं चांगला पर्याय – दीपक केसरकर

“सुप्रीम कोर्टाने दिलेला दिलासा ठराविक मुदतीसाठी असून त्यात काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. पण पोलिसांकडे आत्मसमर्पण करणं चांगला पर्याय आहे,” असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

16:05 (IST) 1 Feb 2022
महाराष्ट्रात दहशतवाद्यांचं, तालिबान्यांचं राज्य – प्रसाद लाड

सरकारचा यंत्रणेवर दबाव आहे. जामीन रद्द व्हावा यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सरकारकडून न्यायव्यवस्थेवर, पोलिसांवर दबाव आणला जात आहे. सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला असतानाही अटकेचे आदेश कोणी दिले हे पहावं लागेल. महाराष्ट्रात दहशतवाद्यांचं, तालिबान्यांचं राज्य सुरु असल्याचं म्हणताना आम्हाला खेद वाटणार नाही असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

15:50 (IST) 1 Feb 2022
अटकेच्या बाबतीत पोलीस योग्य निर्णय घेतील – सरकारी वकील

नितेश राणे काहीही करु शकतात. अटकेच्या बाबतीत पोलीस योग्य निर्णय घेतील. पोलीस सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा, आजच्या निकालाचा अभ्यास करुन निर्णय घेतली. नितेश राणेंना कधी, कुठे अटक करायचं हे पोलीस ठरवतील असं प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे.

15:48 (IST) 1 Feb 2022
लेखी अर्ज मिळाला नसल्याने शरणागती म्हणू शकत नाही – कोर्ट

लेखी अर्ज मिळाला नसल्याने त्यामुळे याला शरणागती म्हणू शकत नाही असं कोर्टाने सांगितलं आहे. तसंच जामीन अर्ज शरण येण्याआधी कोर्टासमोर ठेवलं म्हणूनच ते नाकारलं. त्यामुळेच हा मागच्या दाराने दिलेला जामीन होईल असं आमचं म्हणणं होतं असं प्रदीप घरत म्हणाले आहेत.

15:46 (IST) 1 Feb 2022
…म्हणून नितेश राणेंची गाडी थांबवण्यात आली होती

आता ऑर्डर झाली म्हणून संपलं असं त्यांना वाटलं होतं. आम्ही अर्ज केला आहे त्यावर तुम्हाला म्हणणं मांडायचं आहे. त्यामुळे परत चला हे सांगण्यासाठी नितेश राणेंना थांबवण्यात आलं होतं. त्यांचे वकील पुन्हा कोर्टात आले होते. सर्वांना थांबणं भाग होतं त्यामुळे नितेश राणेंना थांबवलं असं प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे.

15:39 (IST) 1 Feb 2022
…तर तो मागच्या दाराने दिलेला जामीन होईल – सरकारी वकील

“कोर्टाने जामीन देतोय म्हणून बाहेर जाऊ दे किंवा परवानगी देतोय म्हणून बाहेर जाऊ देतो असं सांगायला हवं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे आम्ही कोर्टासमोर अर्ज केला की शरणागतीवर लेखी हुकूम करावा लागेल. १० दिवसांचा दिलासा असल्याने तोवर ताब्यात घेता येणार नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे. त्याच्यावर आम्ही तो वेळ शरण येण्यासाठी होता, त्यामुळे शरण आल्यानंतर ती मुदत संपली असं सांगितलं. पण कोर्टाने म्हणणं मान्य केलं नाही. शरणागतीवर कोणताही निर्णय दिला नाही तर त्याला तो मागच्या दाराने दिलेला जामीन होईल असंही म्हणणं मांडलं,” असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

15:35 (IST) 1 Feb 2022
सरकारी वकिलांनी मांडली बाजू

“आमच्या म्हणण्याप्रमाणे शरण न येताच जामीन अर्ज करणं आणि दुसऱ्या दिवसापासून ते आरोपी न्यायालयात येऊन बसायला लागले या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांना कोर्टासमोर शरण आल्याचं सांगितलं. आपणास लेखी हवं असेल तर तसं देऊ असंही सांगितलं होतं. त्यामुळे अशाप्रकारे आरोपी जे म्हणत होते त्यावर युक्तिवाद झाला आणि न्यायलायीन दाखले दिले गेले. त्याप्रमाणे त्याची शरणागती स्वीकारावी लागेल असं आमचं म्हणणं होतं. एकदा शरणागती स्वीकारल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाशिवाय कुठेही जाता येणार नाही. जे काही करायचं आहे ते कोर्टाच्या आदेशाप्रमाणे करावं लागेल असं आमचं म्हणणं होतं,” अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.

15:31 (IST) 1 Feb 2022
जामीन अर्ज या कोर्टासमोर राखण्यायोग्य नाही सांगत फेटाळला – सरकारी वकील

“जामीन अर्ज या कोर्टासमोर टिकण्यायोग्य नाही सांगत फेटाळला आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्यानुसार प्रथम शरण आलं पाहिजे आणि नंतर जामीन अर्ज केला पाहिजे. पण शरण न येताच जामीन अर्ज केल्याने हा अर्ज कोर्टासमोर टिकण्यायोग्य नाही असं कोर्टाने सांगितलं,” अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.

15:25 (IST) 1 Feb 2022
नितेश राणे हायकोर्टात जाणार

अर्ध्या तासात हायकोर्टात अर्ज करु असं नितेश राणेंच्या वकिलांनी सांगितलं आहे.

15:22 (IST) 1 Feb 2022
नितेश राणेंना ताब्यात घेऊ शकत नाही; कोर्टाने केलं स्पष्ट

सुप्रीम कोर्टाने १० दिवसांची मुदत दिल्याने नितेश राणेंना ताब्यात घेऊ शकत नाही असं कोर्टाने सांगितलं आहे. पोलिसांची दादागिरी सुरु असून हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे नितेश राणेंना अटक करायचं आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात हा मुद्दा मांडू. नितेश राणेंना हात लावला तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होईल असं नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं आहे.

15:17 (IST) 1 Feb 2022
कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं?

कोर्टाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला. यावेळी त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय महत्वाचं आहे ते सांगा अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे अशी विचारणा त्यांनी केली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही आमच्या पुढे मागे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे? असं विचारत त्यांनी संताप व्यक्त केला.

15:12 (IST) 1 Feb 2022
नितेश राणे पुन्हा एकदा कोर्टात

कोर्टाबाहेर जे काही घडलं त्यानंतर नितेश राणे पुन्हा एकदा कोर्टात गेले आहेत. कोर्टाबाहेर जे काही झालं त्याची माहिती न्यायालयात दिली जाऊ शकते.

15:10 (IST) 1 Feb 2022
पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे? निलेश राणे संतापले

सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही आमच्या पुढे मागे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे? निलेश राणे संतापले. कोर्टाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

15:05 (IST) 1 Feb 2022
निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

पोलिसांनी गाडी अडवली असल्याने माजी खासदार निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुरु आहे. निलेश राणे कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे अशी विचारणा करत आहेत. नितेश राणे यावेळी गाडीमध्ये बसलेले आहेत.

15:01 (IST) 1 Feb 2022
नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली

भाजपा आमदार नितेश राणे कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आहे. गाडी अडवल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. दरम्यान यावेळी पोलीस आणि निलेश राणे यांच्याच चर्चा सुरु आहे.

14:57 (IST) 1 Feb 2022
नितेश राणेंची हायकोर्टात धाव

नितेश राणेंचा जामीन नाकारला आहे. इथे जामीन मिळणार नाही याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्ही लगेचच हायकोर्टामध्ये अर्ज केला आहे. उद्या उद्या किंवा परवा सुनावणी होईल असं नितेश राणेंच्या वकिलांनी सांगितलं आहे.

14:56 (IST) 1 Feb 2022
जामीन अर्ज फेटाळला

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का मिळाला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता. त्यानुसार आज कोर्टाने निर्णय दिला असून जामीन नाकारला आहे.

14:53 (IST) 1 Feb 2022
नितेश राणेंच्या सचिवाला चार दिवसांची पोलीस कोठडी

नितेश राणे यांचे सचिव राकेश परब सोमवारी कणकवली पोलीस ठाण्यात सकाळी हजर झाले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी आज सकाळी त्यांना कोर्टासमोर हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवाण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. यामध्ये इतर आरोपींना अटक, मोबाइल हस्तगत करणे हे मुद्दे मांडण्यात आले. पण न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी लिंक

14:46 (IST) 1 Feb 2022
“नितेश राणेंची अटक अत्यावश्यक”

“नितेश राणे नॉट रिचेबल होते हा दावा ते खोडून काढू शकले नाहीत. कोर्टासमोर येईपर्यंत ते नॉट रिचेबलच होते. सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळेपर्यंत ते समोर आले नव्हते. अन्यथा पोलीस त्यांना कधीही अटक करु शकत होते. या तपासात प्रगती होण्यासाठी नितेश राणेंची अटक अत्यावश्यक आहे,” असं प्रदीप घरत म्हणाले.

14:46 (IST) 1 Feb 2022
नितेश राणेंच्या वकिलांकडून हा शिजवलेला कट असल्याचा दावा

“नितेश राणेंच्या वकिलांनी याला शिजवलेला कट, राजकीय हितसंबंध सांभाळण्यासाठी, आरोपीला त्रास देण्यासाठी असं म्हटलं आहे. पण आम्ही कोर्टाचे अधिकारी आहोत. त्यामुळे आम्हाला या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नसतं. आरोपीविरोधात किती सबळ पुरावे आहेत हे आम्हाला कागदपत्रांमधून दाखवायचं असतं. त्यामुळे कट कारस्थान कसं शिजलं? हल्ला का झाला? कारण काय? यावर आमचा युक्तिवाद केंद्रीत होता,” असं प्रदीप घरत यांनी सांगितलं होतं.

14:45 (IST) 1 Feb 2022
राणे यांना पोलीस कोठडीत देण्याची मागणी न्यायालयाकडून अमान्य

जामीन अर्जावर निकाल होईपर्यंत आमदार राणे यांना पोलीस कोठडीत देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड प्रदीप घरत यांनी केली. मात्र ही मागणी जिल्हा न्यायालयाने अमान्य करीत राणे यांना न्यायालयातून जाण्याची मुभा दिली आहे. याबाबतचा निकाल देणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

14:44 (IST) 1 Feb 2022
दुपारी ३ वाजता सर्वांनी हजर राहा, कोर्टाचा आदेश

विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सोमवारी सुनावणीनंतर कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “आज कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आहेत. उद्या दुपारी ३ वाजता निकाल दिला जाणार आहे. कोर्ट संपूर्ण घटनाक्रम तपासून पाहणार आहे. सुप्रीम कोर्टाने काय आदेश दिले? आदेशनुसार ते हजर झाले असून त्यातील कायदेशीर, तांत्रिक बाबी काय आहेत या सर्व गोष्टी कोर्टाने जाणून घेतल्या आहेत. कोर्टाने सर्वांना दुपारी ३ वाजता हजर राहण्यास सांगितलं आहे”.

14:43 (IST) 1 Feb 2022
नितेश राणे यांच्या वकिलांचा तीन तास युक्तिवाद

नितेश राणे यांच्याकडून वकील सतीश मानेशिंदे यांनी सोमवारी तब्बल तीन तास युक्तिवाद केला. राकेश परब पीए असल्याने दिवसातून किती वेळाही संभाषण होऊ शकतं. तसंच ते एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून कथित आरोपीसोबत असलेल्या फोटोमुळे थेट कनेक्शन असल्याचं म्हणू शकत नाही असा युक्तिवाद सतीन मानेशिंदे यांनी केला. यासोबतच गुन्हा घडला तेव्हा नितेश राणे मुंबईतच होते, तसंच पोलिसांना सर्व सहकार्य करण्यात आलं असल्याचंही ते म्हणाले.

14:42 (IST) 1 Feb 2022
नितेश राणेंचे स्वीय्य सहाय्यक, अंगरक्षक, उजवे डावे हात सर्वजण कटात सहभागी – विनायक राऊत

सुप्रीम कोर्टाने अर्ज फेटाळला आहे त्याअर्थी जिल्हा न्यायालयात नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जामीन मिळेल असं वाटत नाही. नितेश राणेंचे स्वीय्य सहाय्यक, अंगरक्षक, उजवे डावे हात सर्वजण कटात सहभागी असून तसं दिसून आलं आहे. म्हणूनच मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्टासमोर नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हल्ल्यातील सहभाग सिद्ध झाला आहे असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

14:42 (IST) 1 Feb 2022
सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं होतं?

नितेश राणे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. तर सरकारच्या बाजूने अभिषेक मनू सिंघवी कोर्टात उपस्थित होते. नितेश राणेंना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलं असल्याचा दावा यावेळी मुकुल रोहतगी यांनी केला. तसंच पेपर कटरने जीवे मारण्याचा उल्लेख झाला असून हे शक्य आहे का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. ज्यांची नावं आहेत त्यांच्याशी संपर्क झाल्याचा कोणताही पुरावा नसून, आदित्य ठाकरेंना डिवचल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.

अभिषेक मनू सिंघवी यांनीदेखील कोर्टात युक्तिवाद करताना नितेश राणे यांच्यावर आतापर्यंत असलेले गुन्हे फक्त राजकीय नसून इतरही आहेत असं सांगितलं. पैशांची देवाणघेवाण, षडयंत्र याचा तपास होणं गरजेचं आहे यामुळे जामीन मिळू नये असा युक्तिवाद त्यांनी केला. यानंतर कोर्टाने नितेश राणे यांना संबंधित कोर्टात शरण व्हावं असे निर्देश दिले असून त्या १० दिवसांत अटक केली जाऊ नये असं स्पष्ट केलं.

14:38 (IST) 1 Feb 2022
उच्च न्यायालयात काय झालं होतं ?

मुंबई हायकोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. यावेळी त्यांना सर्वोच्च न्यायालयात आदेशाला आव्हान देता यावे तोपर्यंत त्यांना कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्याची मागणी त्यांच्या वकिलाने केली. यावेळी नितेश राणे यांना कठोर कारवाईपासून २७ जानेवारीपर्यंत अंतरिम संरक्षण देण्यात येत असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. विशेष सरकारी वकिलांनी सरकारने एका आठवड्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे नितेश राणेंना २७ जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला होता.

14:38 (IST) 1 Feb 2022
नितेश राणे जिल्हा न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत

नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेतलं. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. यानंतर शिवसेना आक्रमक झाली होती.

“दुचाकीवर असताना मला जोरात एका गाडीने धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की त्यामुळे मी रस्त्याच्या बाजूने फरफटत गेलो. माझ्या हाताला जखमही झाली आहे. फरफटत जाऊन मी एका बाजूला पडलो होतो आणि माझी दुचाकी माझ्या पायावर होती. ती एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा होती. पुढे जाऊन २०-२५ फुटांवर जाऊन थांबली. त्यातील एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि जाताना गोट्या सावंत, नितेश राणे यांना कळवलं पाहिजे असं म्हणत खिशातून मोबाईल काढला,” असं संतोष परब यांनी सांगितलं होतं.

नितेश राणे सोमवारी आपले बंधू निलेश राणेंसोबत कोर्टासमोर हजर झाले होते.

Web Title: Bjp mla nitesh rane bail application in sindhudurg court santosh parab attack case is held on today live updates sgy