शिवसेनेचे ( ठाकरे गट ) निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत यांनी आमदार नाईक यांना पदावरून हटवलं आहे. नाईकांना हटवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तीन जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, हे तीनही जण पूर्वीचे राणे समर्थक मानले जात आहेत. यावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे.

प्रसारमाध्यमांनी सिंधुदुर्गात करण्यात आलेल्या नियुक्त्यांबाबत विचारलं असता नितेश राणे म्हणाले, “ठाकरे सेना राणे समर्थकांकडेच आहे. आमचे सर्व माजी समर्थक ठाकरे सेनेचं नेतृत्व करतात. त्यातील तीन मधून दोन तर शिंदे गटात जाण्यासाठी एका पायावर तयारीत आहेत. तिसरा आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची हे आमच्यावर आहे. आम्ही ठरवू तेव्हा व्हेंटिलेटरची वायर काढून टाकू.”

हेही वाचा : “CM म्हणजे ‘करप्ट माणूस’”, आदित्य ठाकरेंनी सांगितला नवा अर्थ; म्हणाले…

“…ते आमच्यासाठी चांगलेच होत आहे”

“उद्धव ठाकरेंच्या निष्ठावान सैनिकांना काहीही स्थान राहिलं नाही. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासून उद्धव ठाकरेंनी पक्ष बांधला नाही. यांचं उत्तर उदाहरण या नियुक्त्या आहेत. जे होत आहे, ते आमच्यासाठी चांगलेच होत आहे. २०२४ च्या निवडणुकीत सिंधुदुर्गात तीनही आमदार आणि खासदारही निवडून आणू,” असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केली आहे.

“जेवढा द्वेष पाकिस्तान करतो, तेवढाच…”

दरम्यान, शनिवारी ( ११ मार्च ) नितेश राणेंनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीकास्र डागलं होतं. “राहुल गांधींवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. बाहेर देशांत भारताची बदनामी करून टाळ्या मिळवत आहेत. हे देशद्रोह्यासारखं आहे. म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला टाकला पाहिजे. जेवढा द्वेष पाकिस्तान करतो, तेवढाच राहुल गांधी करत आहेत. पाकिस्तान आणि राहुल गांधींची भाषा एकच असून, त्यांना देशाबाबत बोलण्याचा अधिकार नाही.”

हेही वाचा : शितल म्हात्रेंच्या ‘त्या’ आरोपांना प्रियंका चतुर्वेदींचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाल्या, “आमचं नाव घेऊन…”

“पाकिस्तान आणि राहुल गांधी…”

“राहुल गांधी ज्या घरात राहतात सुविधा वापरतात ते भारत सरकारच्या आहेत. त्याच भारताची तुम्ही बदनामी करत असाल, तर दाऊद इब्राहिम, ओसामा बिन लादेन आणि राहुल गांधींमध्ये काही फरक नाही. पाकिस्तान आणि राहुल गांधी एकच आहेत,” अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.