काही दिवसांपूर्वी भाजपा नते हर्षवर्धन पाटील यांनी केलेलं एक विधान विशेष चर्चेत आलं होत. “मी भाजपामध्ये आल्यापासून ईडी वगैरेचा त्रास नसून शांतपणे झोप लागते”, असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता अजून एका भाजपा नेत्याने या प्रकारचं वक्तव्य केलं आहे. वक्तव्यांचा विपर्यास केल्याचा दावा जरी भाजपाकडून केला जात असला, तरी ऑन कॅमेरा हे वक्तव्य आल्यामुळे त्यावर राजकीय वर्तुळातून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

भर कार्यक्रमात केलं वक्तव्य, म्हणाले…

सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात भाजपा खासदार संजय काका पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात स्टेजवरून बोलताना संजय काका पाटील यांनी आर्थिक गोष्टींवर मिश्किलपणे बोलताना ईडीची कारवाई आणि भाजपाचं संरक्षण या आशयावर केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. “माझ्यामागे ईडी लागणार नाही. मी भाजपाचा खासदार आहे. त्यामुळे ईडी इकडे येणार नाही”, असं संजय काका पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावर आता राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून देखील आक्षेप घेतला जात आहे.

Manoj Jarange patil on Pankaja Munde Maratha Reservation
“माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा…”, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडेंना इशारा
Congress candidate Praniti Shinde criticizes BJP in Solapur
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी काढली भाजपची लाज
Sujay Vikhe Patil
“…तर तुतारी वाजवून टाका”; भाजपाचे खासदार सुजय विखे यांचे विधान चर्चेत
BJP, Sangli, Resignation of former MLA,
माजी आमदाराचा राजीनामा तर पक्षांतर्गत खदखदीमुळे सांगलीत भाजपची चिंता वाढली

कर्ज काढून ४० लाखांची गाडी

दरम्यान, यावेळी बोलताना संजय काका पाटील यांनी कर्ज काढून गाड्या खरेदी करत असल्याचं सांगितलं. “आम्ही राजकीय माणसं कर्ज काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो. लोकांना दिसलं पाहिजे की आमच्याकडे भरपूर आहे. पण आम्ही बँकेचं कर्ज काढून ४० लाखांची गाडी घेणार. मी वस्तुस्थिती मांडतोय. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर रेकॉर्डिंग झालं तरी हरकत नाही. आमचे कर्जाचे आकडे तुम्ही जर बघितले…गंमती गंमतीत हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की भाजपामध्ये आल्यापासून झोप चांगली लागते. तसं ईडीनं आमची कर्ज बघितली, तर म्हणतील ही माणसं आहेत का काय आहेत”, असं संजय काका पाटील यावेळी म्हणाले.

हर्षवर्धन पाटील यांचं ‘ते’ विधानही चर्चेत!

कधीकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी राज्यातल्या विधानसभा निवडणुकांपूर्व भाजपामध्ये प्रवेश केला. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी एका खासगी कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केलेलं विधान चर्चेत आलं होतं. एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आपण भाजपामध्ये आल्यानंतर काय बदल घडला, याविषयी मिश्किल टिप्पणी केली.

भाजपामध्ये आलो, आता चौकशी वगैरे काही नाही, शांत झोप लागते – हर्षवर्धन पाटील

“इथे आमदार साहेब मला म्हणाले, मी आहे तिथे सुखी आहे, तम्ही दिल्या घरी सुखी राहा. मला विचारणा झाली की तुम्ही भाजपामध्ये का गेलात? त्यावर मी त्यांना म्हटलं ते तुमच्या नेत्यालाच विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये का गेले. पण मी सांगतो, इथे मस्त निवांत आहे. भाजपामध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय”, असं हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले होते.