scorecardresearch

“नाना पटोलेंना श्रीनगरहून आल्याने जास्त थंडी भरली, त्यामुळे ते…”; सुजय विखेंची सडकून टीका

“नाना पटोले आत्ताच श्रीनगरहून आल्याने त्यांना जास्त थंडी भरली आहे. त्यामुळे ते असं बोलू शकतात,” असं म्हणत सुजय विखेंनी पटोलेंवर टीका केली.

Sujay Vikhe Nana Patole
सुजय विखे व नाना पटोले (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भाजपा खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली. “नाना पटोले आत्ताच श्रीनगरहून आल्याने त्यांना जास्त थंडी भरली आहे. त्यामुळे ते असं बोलू शकतात,” असं म्हणत सुजय विखेंनी पटोलेंवर टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेल्या आव्हानावरही भाष्य केलं. ते अहमदनगरमध्ये माध्यमांनी दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

सुजय विखे म्हणाले, “नाना पटोले आत्ताशी श्रीनगरहून परत आले आहेत. त्यांना जास्त थंडी लागली आहे. त्यामुळे ते असं बोलू शकतात. ते माध्यमांनी फार मनावर घेऊ नये.”

“आम्ही भाजपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करतो”

“आम्ही भाजपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. त्यांच्या नेतृत्वातच मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाल्या. भविष्यातही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसह विधानसभा, लोकसभा देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढेल. त्यात पक्ष एकसंघटित राहून चांगलं प्रदर्शन करेल,” असं मत सुजय विखे यांनी व्यक्त केलं.

“त्यांनी आधी त्यांच्या पक्षाचं पहावं आणि मग…”

“सरकार आल्यावर मागील तीन महिन्यात आमचं झालेलं काम त्यांना पाहावलं जात नाही. त्यांना बोलण्याचाही अधिकार नाही. त्यांनी आधी त्यांच्या पक्षाचं पहावं आणि मग आमच्या पक्षावर चर्चा करावी,” असं म्हणत विखेंनी पटोलेंना टोला लगावला.

“अगोदर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा”

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेल्या आव्हानावर बोलताना सुजय विखे म्हणाले, “आव्हान देणाऱ्यांच्या पिताश्रींनी मी विधान परिषदेचा राजीनामा देईन असंही जाहीर केलं होतं. अगोदर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा.”

हेही वाचा : “ही ‘स्क्रिप्टेड स्टोरी’, बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्यासाठी षडयंत्र रचलं आणि…”, सत्यजीत तांबेंचे गंभीर आरोप

“जनतेला त्या नेत्यावर आणि पक्षावर विश्वास राहिलेला नाही”

“जे पक्षश्रेष्ठी आहेत, महाराष्ट्राचे तीन वर्षे मुख्यमंत्री राहिले, जे म्हणतात माझा शब्द अंतिम आहे त्यांनीच दिलेला राजीनाम्याचा शब्द पाळलेला नाही. जोपर्यंत ते त्यांचा शब्द पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांच्या पक्षाचा कोणताही पदाधिकारी काहीही बोलला तरी जनतेला त्या नेत्यावर आणि पक्षावर विश्वास राहिलेला नाही,” असंही सुजय विखेंनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 09:07 IST