राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना पाहायला मिळत आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाविषयी शरद पवारांनी हे विधान केलं असून त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे, असं शरद पवार एका कार्यक्रमात म्हणाले. त्यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवारांची थेट औरंगजेबाशीच तुलना करणारं ट्वीट केलं आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवारांनी एका कार्यक्रमात बोलताना काही चर्चवर झालेल्या हल्ल्यांचा संदर्भ देत मोठं विधान केलं होतं. “या देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन समाजांच्या बाबत चिंता वाटावी असं चित्र आहे. ख्रिश्चन समाजाच्या चर्चवर हल्ले होत आहेत. मुस्लीम समाजात चार-दोन लोकांकडून चुका होऊ शकतात. तशा हिंदूंकडूनही चुका होतात. काही लोक जाणीवपूर्वक भेदाभेद कसा होईल, द्वेषभावना कशी वाढेल याची काळजी घेतात. हे या देशासमोरचं आज एक मोठं आव्हान मला दिसतंय”, असं शरद पवार म्हणाले होते.

MIM, Kolhapur, Hindu organizations,
कोल्हापुरात ‘एमआयएम’चा पाठिंबा घेण्यामागे कोणते षडयंत्र दडले आहे; हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सवाल
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Supriya Sule, Sharad Pawar,
भाजपचे एकच स्वप्न, शरद पवारांना संपवणे; सुप्रिया सुळेंचा पुनरुच्चार
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

विधान चर्चेत आल्यानंतर शरद पवारांचं स्पष्टीकरण

दरम्यान, धार्मिक मुद्द्यावर केलेलं विधान चर्चेत आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “ख्रिश्चन व मुस्लीम समाज धोक्यात आहे असं मी म्हणालो, कारण ओडिशा आणि इतर काही राज्यांमध्ये चर्चवर हल्ले झाले आहेत. चर्च आणि ख्रिश्चन समाज तसा शांतताप्रिय असतो. एखाद्याची काही चूक असेल, तर पोलीस कारवाई करावी. त्यासाठी धार्मिक स्थळावर हल्ला का करायचा?” असं शरद पवार म्हणाले.

ख्रिश्चन व मुस्लीम समाजाविषयी चिंता वाटते असं का म्हणालात? उदाहरण देत शरद पवार म्हणाले…

“हे जे घडतंय ते सहजासहजी घडत नाही. त्यामागे एकट्यादुकट्याचा हात नाही, त्यामागे एक विचारधारा आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही”, असंही शरद पवारांनी पत्रकार परिषदेत नमूद केलं.

निलेश राणे यांचं खोचक ट्वीट

दरम्यान, शरद पवारांचं विधान आणि त्यावरचं स्पष्टीकरण आल्यानंतर त्यासंदर्भात भाजपा नेते निलेश राणे यांनी खोचक ट्वीट केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करून त्यावर निलेश राणेंनी शरद पवारांना लक्ष्य करणारं ट्वीट केलं आहे. “निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधीकधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार”, असं या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणाले आहेत.

आता निलेश राणे यांच्या या ट्वीटवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातंय, यावर चर्चा होऊ लागली आहे.