ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत भाजपची स्वबळावर सत्ता आणण्याचा दृढ निर्धार करण्याचे आवाहन करीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना शतप्रतिशत भाजपचा कानमंत्र दिला. गेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपचा पराभव झाला, त्या प्रत्येक जागी अगदी बूथपासून भाजपची ताकद वाढविण्यावर भर द्यावा आणि पुढील निवडणुकांमध्ये सर्व जागांवर भाजपचे कमळ फुललेले दिसायला हवे, असे शहा यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता न आल्याने युती तोडल्यानंतरही शिवसेनेच्या मदतीने भाजपला सरकार स्थापन करावे लागले आहे. शिवसेना किंवा युतीचा कोणताही उल्लेख न करता प्रत्येक जागेवर आणि प्रत्येक निवडणुकीत भाजपने सर्व जागा मिळवून सत्ता काबीज करण्याचे आवाहन शहा यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी आणि राज्य परिषदेची बैठक शनिवारी कोल्हापूरमध्ये पार पडली. शहा यांनी परिषदेचे उद्घाटन करून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
शहा यांनी स्वबळावरच पुढील निवडणुकांमध्ये यश संपादन करण्याचे आवाहन केल्याने आणि शिवसेना किंवा युतीचा उल्लेखही न केल्याने पुढील निवडणुकांमध्ये युतीचे भवितव्य अधांतरी असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रात आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचारमुक्त शासन सत्तेवर असून सरकार चांगली कामगिरी करीत आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे सांगून शहा यांनी मोदी सरकारने घेतलेल्या जनधन योजनेपासून अनेक निर्णयांची माहिती देऊन मंत्र्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वानी घरोघरी जाऊन जनतेला माहिती द्यावी.  सरकारवर होत असलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करून सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोचविणे, हाच चांगला मार्ग असल्याचे शहा यांनी सांगितले.

‘कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली’
राज्यातही फडणवीस यांनी काही प्रमाणात टोलमुक्ती यासह अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. गुंतवणूक वाढत आहे. महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. येथे जिल्हा परिषदा, महापालिका यांसह सर्व निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळत आहे. विजयाची ही मालिका यापुढे प्रत्येक निवडणुकीत सुरू राहावी आणि पक्षाची ताकद प्रत्येक जागी व प्रत्येक मतदान केंद्र क्षेत्रात वाढवावी. भाजपला स्वबळावर विजय मिळावा, अशी अपेक्षा शहा यांनी व्यक्त केली. भाजपची सत्ता आल्याने आता जबाबदारी कमी होण्याऐवजी ती वाढली आहे. त्यामुळे सत्ता उपभोगण्याकडे लक्ष न देता कार्यकर्त्यांनी पक्षमजबुतीकडे आणि जनतेशी संपर्क वाढविण्याकडे अधिक लक्ष द्यावे, असे शहा यांनी स्पष्ट केले.

जागावाटप योग्य झाले, तरच युती टिकणार-दानवे
भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर सरकार चालविण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले आहेत. महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीने लढवाव्यात, अशी आमची भूमिका आहे. पण योग्य जागावाटप झाले, तरच युती होईल, अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे केले. दरम्यान, आपण सरकारकडे सुरक्षा मागितली नव्हती, पण सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने ती दिली अशावी, असे दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मी सरकारकडे सुरक्षा व्यवस्था मागितलेली नाही किंवा सरकारनेही पोलिसांना त्यासाठी सूचना केलेली नाही. यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची समिती असून या समितीने सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची शिफारस केली आहे. कोणाच्याही जीविताला किती धोका आहे, हे पाहून ही समिती कोणत्या दर्जाची सुरक्षा पुरवायची, याचा निर्णय घेते. आमची सत्ता नसल्याने याआधीच्या प्रदेशाध्यक्षांना सुरक्षेची गरज नव्हती. पण आता भाजपची सत्ता आल्याने ती वाटली असावी, असे मत दानवे यांनी व्यक्त केले.