नांदेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीची त्रिशताब्दी गेल्या महिन्यात वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी केल्यानंतर प्रदेश भाजपाने आता जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मरणार्थ २३ जून ते ६ जुलै दरम्यान द्विसाप्ताहिक कार्यक्रम आखला असून त्यासाठी संयोजक व सहसंयोजकांची नियुक्ती जाहीर केली आहे.
श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा स्मृतिदिन येत्या २३ जून रोजी आहे, तर त्यानंतर १४ दिवसांनी म्हणजे ६ जुलै रोजी त्यांची जयंती येते. या दरम्यान प्रदेश भाजपाने सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांची आखणी केली आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे वरील उपक्रमाचे प्रदेश संयोजक असून वर्षा डहाळे (प.महाराष्ट्र), चैतन्यबापू देशमुख (मराठवाडा), दादाराव जाधव (ऊ.महाराष्ट्र) आणि शशिकांत कांबळे (कोकण विभाग) या सहसंयोजकांची नियुक्ती पक्षाने नुकतीच जाहीर केली. बूथ स्तरावर देण्यात आलेल्या सहा कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम असल्याचे पक्षाने कळविले असून २३ जून ते ६ जुलै दरम्यान राज्यातील प्रत्येक बूथ स्तरावर मुखर्जींच्या स्मरणार्थ कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.
२३ जून रोजी मुखर्जी यांच्या पुतळ्यास-प्रतिमेस माल्यार्पण करणे तसेच मुखर्जी यांच्या कार्यकर्तृत्वावर चर्चासत्रांचे आयोजन आणि होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना ठळक प्रसिद्धी देणे असे सर्व जिल्हाध्यक्षांना व विभाग संघटनमंत्र्यांना कळविण्यात आले आहे. २३ जून ते ६ जुलै या काळात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. या उपक्रमासंबंधी संयोजक-सहसंयोजक यांची एक बैठक लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले.
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी हे नाव भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी वंदनीयच आहे. पण मागील काही वर्षांत काँग्रेस पक्षातील अनेक नेते व त्यांचे समर्थक भाजपामध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले असल्याच्या पार्श्वभूमीवर संघ आणि जनसंघातील पूर्वसुरींच्या कार्यकर्तृत्वाची गाथा नव्या मंडळींना वेगवेगळ्या माध्यमांतून सांगण्याची आवश्यकता आहे. वरील उपक्रमाच्या निमित्ताने होणाऱ्या बैठकीत आपण ही सूचना मांडणार आहोत.- चैतन्यबापू देशमुख, सहसंयोजक