केंद्राप्रमाणे महाविकास आघाडीने इंधन दर कपात करावी’

नगर : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा, या मागणीसाठी शहर भाजपच्या वतीने आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले.

आंदोलनात भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, वसंत राठोड, विवेक नाईक, युवराज पोटे, तुषार पोटे, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, शिवाजी दहिंडे, मनेष साठे, धनंजय जामगांवकर, प्रशांत मुथा, अमित गटणे, शशांक कुलकर्णी, सुमित बटुळे, विलास गांधी, पंकज जहागीरदार, ऋग्वेद गंधे आदि सहभागी होते.

या प्रसंगी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष गंधे म्हणाले, राज्य सरकार स्वत:चे अपशय झाकण्यासाठी नेहमीच केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. परंतु केंद्र सरकारने चांगल्या योजना राबविल्या त्यांची अंमलबजावणी राज्य सरकार करत नाही. इंधन दरवाढीचा बाऊ करून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आघाडी सरकार करत आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली. आता मोदी सरकारने दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आघाडी सरकारनेही कर कपात करून अधिक मदत करावी, ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तथापि राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.