नगर : महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाईमुळे व चुकीचा ‘इम्पिरीकल डाटा’ दिल्याने राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपले. आता वेळीच सरकारने जागे व्हावे व तातडीने पुन्हा व्यवस्थित इम्पिरीकल डाटा सादर करावा तरच मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे २८ टक्के आरक्षण कायम राहील. आगामी निवडणुका जर ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या तर भाजप आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा शहर भाजपचे जिल्ह्याध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिला. महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाईमुळे राज्यातील ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने शहरातील दिल्ली गेट समोर धरणे व निदर्शने आंदोलन करत करण्यात आले. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महेंद्र गंधे बोलत होते. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, महिला जिल्हाध्यक्षा अंजली वल्लाकटी, नरेंद्र कुलकर्णी, सचिन पावले, संजय भागवत, चिन्मय पंडित, युवराज पोटे, रवींद्र  बारस्कर, संजय ढोणे, मिलिंद भालसिंग, महेश नामदे, बाबा सानप, ज्योति दांगडे, केसकर कालिंदी, कुसुम शेलार, अमोल निस्ताने, अभिजित दायमा आदी आंदोलनात सहभागी झाले होते.