कांॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण उरकांदे, तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे यांचे पती व भाजप नेते राणा रणनवरे यांनी अन्यायाचा पाढा वाचून पक्षाला रामराम ठोकला. दोघांनीही स्वतंत्र पत्रकार परिषदेतून आपबिती कथन केली.
कांॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या दहा वर्षांंपासून जबाबदारी सांभाळणारे उरकांदे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक असून त्यांच्या स्वत:च्या संस्थाही आहेत. मेघेंना घायकुतीस आणणारे राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी उरकांदेचे पद टिकविण्यासाठी चांगलाच आटापिटा केला होता, तसेच उरकांदेंच्या पत्नीला जिल्हा परिषदचे दहा वर्ष सदस्य व सभापतीपदही मिळवून दिले. कांबळेंचा आशीर्वाद हीच ओळख असणाऱ्या उरकांदेंनी मात्र त्यांना हिंगणघाटमधून तिकिट मिळू न देण्यास कांबळेंना जबाबदार ठरवून पक्षाचा राजीनामा दिला. आज दु:खद अंत:करणाने त्यांनी व्यथा मांडली. ते म्हणाले, निष्ठावंतांची आता कदरच होत नाही. पक्ष संघटना मी मजबूत केली. आता संधी आली तर तीही डावलली गेली. वेळेपर्यंत मला अंधारात ठेवले. मेघेंच्या वैद्यकीय संस्थेत मुलीला प्रवेश मिळावा म्हणून मेघेशरण होण्यासाठी कांबळेंना रामराम केल्याची चर्चा आहे. याविषयी प्रश्न विचारल्यावर उरकांदे यांनी हा आरोप फे टाळून लावला, तसेच आता माझा समाज कॉंग्रेसवर नाराज झाल्याचेही आवर्जून सांगितले. यापुढील राजकीय वाटचाल समर्थकांशी चर्चा करून ठरविणार असल्याचे ते म्हणाले.  जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीसाठी खेचणारे राणा रणनवरे यांनी दत्ता मेघेंवर तोंडसुख घेतले. पक्षात कालपरवा आलेल्या मेघे व त्याच्या समर्थकांच्या दबावात येऊन मला वध्र्याची उमेदवारी नाकारण्यात आली. मी रितसर अर्ज केल्यावर प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फ डणवीस यांनी मला तिकीटही कबूल केले. गेल्या २० वर्षांंपासून मी सेलू परिसरात पक्षाचे काम केले. त्यामुळेच मला व पत्नीला लोकांनी निवडून दिले. आजही या भागातील मोठय़ा २५ गावांचे सरपंच, पं.स.सदस्य, विद्यापीठ प्रतिनिधी, तालुका नेते माझ्या मागे आहे. त्यांच्याच आग्रहास्तव मी उभा राहणार आहे. एवढेच नव्हे, तर चार अपक्ष उमेदवार माझ्या समर्थनार्थ उमेदवारी मागे घेत आहेत.     त्यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात मेघेंचा मोठा हातभार लागल्याची चर्चा असल्याने मेघेंवरील संतापापोटी जि.प.अध्यक्षपद सोडून देणार काय, या प्रश्नावर काही काळ स्तब्ध झालेल्या रणनवरेंनी मेघेंमुळे नव्हे, तर पक्षामुळे माझी पत्नी अध्यक्ष झाली. मी अध्यक्षपद मागितले नाही. आग्रह धरला नाही. पक्षश्रेष्ठींनीच मला हे पद स्वीकारण्याची विनंती केली. मेघे म्हणत असतील की त्यांचाही खर्च झाला तर तो दामदुपटीने परत करण्यास मी तयार आहे. पक्षनिष्ठा मला मेघेंनी शिकवू नये. ज्या पक्षाने मला ताकद दिली त्या पक्षाला विसरणाऱ्यांपैकी मी नाही. पक्षनेते नितीन गडकरी व देवेंद्र फ डणवीस यांना मी दैवत मानतो. त्यांनी आदेश दिल्यास कोणताही त्याग करीन, पण उमेदवारी मागे घेणार नाही. आता यापुढील लढाई मेघेविरुध्द कांबळे नव्हे, तर रणनवरे, अशीच होणार, असा निर्धार रणनवरे यांनी व्यक्त केला.