स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४० वी जयंती काल (२९ मे) संपूर्ण देशभरात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात सावरकरांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यासह केंद्रातले अनेक नेते उपस्थित होते. राज्यातल्या तसेच केंद्रातल्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सावरकरांच्या विचारांचं अनुसरण करणाऱ्या नेत्यांनी सावरकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना वीर सावकर यांच्या जयंतीचा विसर पडल्याची टीका भारतीय जनता पार्टीने केली आहे.
मुंबई भाजपाने ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे. यात त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपाने उद्धव ठाकरे यांचे दोन फोटो शेअर केले आहेत. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या फोटोंना अभिवादन करतानाचे उद्धव ठाकरे यांचे दोन फोटो भाजपाने शेअर केले आहेत. तर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “कॉंग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची लाचारी, गांधी परिवारांची जयंती साजरी करणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा पडला विसर!”




सावरकरांची मानसिकता गुलामगिरी सहन न करण्याची : नरेंद्र मोदी
‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे निर्भय वृत्तीचे आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व होते. गुलामगिरी कदापिही मान्य नसलेली त्यांची मानसिकता होती,’’ असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. ‘मन की बात’ या संवादसत्रात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन केले.